प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही काही नागरिक ऐकत नसल्याने कोराेनाची साखळी तोडणे प्रशासनाला अवघड जात होते. त्यामुळे पंढरपूर पोलिसांकडून शहराबाहेर व शहरातील चौकाचौकांत नाकाबंदी करून बेशिस्त नागरिकांवर कारवाई करणे भाग पडले.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण पवार, पोनि किरण अवचर, पोनि प्रशांत भस्मे, सपोनि प्रशांत पाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कोविड सेंटरमध्ये केली बारा जणांची रवानगी
लॉकडाऊनच्या कालावधीत रस्त्यावर फिरू नका, असे वेळोवेळी आवाहन करूनही अनेक जण काहीही काम नसताना मोकाट फिरताना दिसून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करूनही ती संख्या कमी होताना दिसली नाही. म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चौकाचौकांत पोलिसांची पथके उभी करून मोकाट फिरणाऱ्यांना धरून रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्याची मोहीम राबविली. यामध्ये ८ ते १० मे या कालावधीत ४२ जणांची मोकाट फिरताना टेस्ट केली असता चार जण पॉझिटिव्ह आढळले. तर शहरातील विविध हॉस्पिटल्ससमोर रुग्णांच्या नातेवाइकांनी गर्दी करून नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८९ जणांची कोराेना चाचणी केली. यामध्ये ८ जण बाधित आढळून आले. या सर्व बारा जणांची पोलीस प्रशासनाने धडक कोविड सेंटरमध्ये रवानगी केली. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्यांवर पंढरपूर पोलिसांनी वचक निर्माण केला आहे.
कोट :::::::::::::::::::::::::
संचारबंदीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा भविष्यात यापेक्षा आणखी धडक कारवाई केली जाईल.सध्या दंडात्मक वसुली, गुन्हे दाखल करणे, यासह रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करून नागरिकांना कोविड सेंटरमध्ये पाठविण्याची मोहीम सुरू आहे. प्रशासनाने दिलेले नियम पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे.
- विक्रम कदम
उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर