राजुरी येथील हरिबा बंडगर यांचे निजामपूर रस्त्यावर झोपडीचे घर आहे. गुरुवारी दु.२च्या सुमारास कडक उन्हामुळे अचानक त्यांच्या झोपडीस आग लागली. बघता-बघता आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे झोपडीतील दोन गाभण शेळ्यांसह एक शेळी, दोन पोती गहू, दोन पोती ज्वारी, लोखंडी पेटीतील रोख ७० हजार रुपये, सोने-चांदीच्या दागिने, संसारोपयोगी साहित्यासह सर्व कागदपत्रे साहित्य जळून भस्मसात झाले.
आग विझविण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने, अर्ध्या तासात बंडगर कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले. आगीचे वृत्त समजताच, घटनास्थळी सरपंच प्रतिभा व्हळगळ, पोलीस पाटील विजय वाघमारे, तलाठी वैशाली गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, दोन दिवसांनंतरही या घटनेची पोलिसांत नोंद नाही. याबाबत तलाठी वैशाली गायकवाड यांनी जळीत झोपडीचा पंचनामा केला असून, शासकीय मदतीसाठी अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवून दिला आहे.