सोलापूर :
शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील दत्तनगरातील पाच रेडिमेड कपडे व शिलाई मशीनच्या कारखान्यांना सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पाच कारखाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, आग लागल्याची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अथक परिश्रमानंतर सकाळी दहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे. आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी मदत केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्त नगर भागातील उमाशंकर कामुनगी यांच्या प्लॅन्टच्या भागात भाडेकरी असलेले गड्डम, चिकल्ल, तारा यासोबतच पाच ते सहा कारखाने व गणपती तयार करण्याचे गोडाऊनला सोमवारी सकाळी आग लागली. आगीचे लोळ मोठया प्रमाणात पसरल्याने ही घटना उघडकीस आली.
या आगीत गड्डम व कुरापाटी या दोन कारखान्याचे मोठे नुकसान झाले. या आगीत किती नुकसान झाले व आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळाले नसल्याचे सांगण्यात आले. पोलिस व अग्निशामक दल या आगीचे नेमकं कारण शोधण्याचे काम करीत आहेत.