सोलापूर : अचानक धूर येऊ लागला... काय झाले आहे हे पाहत असताना, आग म्हणता म्हणता सुमारे २०० मोटरसायकली जळून खाक झाल्या. रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. आगीत रिक्षा, टेम्पो व अन्य जप्त करण्यात आलेल्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले. ही आग परिसरातील गवत पेटल्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी ११ वाजता सदर बझार पोलीस ठाण्यात कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर होते. अचानक पाठीमागील बाजूने धूर येण्यास सुरुवात झाली. काय झाले हे पाहण्यासाठी पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनच्या मागे गेले असता मोटरसायकली जळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ अग्निशामक दलास पाचारण केले.
पहिल्यांदा होटगी रोड व रविवार पेठ अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचा मारा करीत असताना आग आणखी भडकत होती. आग आटोक्यात येत नसल्याचे पाहुन रविवार पेठ, सावरकर मैदान येथून आणखी दोन गाड्या मागवण्यात आल्या. पोलीस स्टेशनच्या तिन्ही बाजूने पाण्याचा मारा केला जात होता. शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या बाजूला असलेल्या भिंतीवरून आगीवर पाणी मारण्यास सुरुवात केली.
दरम्यान, आग इतकी मोठी होती की, पाण्याचा मारा केल्यानंतर ब् ाहुतांश गाड्यांचे सांगाडेच फक्त जागेवर दिसू लागले. ११ वाजता लागलेली आग तब्बल १२.१५ वाजेपर्यंत विझवण्याचे काम सुरू होते. अग्निशामक दलाचे जवान आतमध्ये उतरून प्रत्येक मोटरसायकलला पाण्याचा मारा करीत होते. अग्निशामक दलाच्या एकूण ५ गाड्यांनी पाण्याचा मारा केल्यानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. घटनेची माहिती कळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बहिरट, फौजदार रईसा शेख आदी पोलीस कर्मचारी यांनी आगीची पाहणी केली.
जप्त करण्यात आलेली वाहने- पोलीस ठाण्याच्या वतीने गेल्या ५ ते ६ वर्षांच्या कालावधीत विविध गुन्ह्यात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. काही बेवारस सापडलेल्या आहेत तर काही गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत. यामध्ये मोटरसायकली, रिक्षा, टेम्पो, चार चाकी कार, फेरीवाल्या हातगाड्या, टपºया, सायकली आदींचा समावेश आहे.
- पोलीस स्टेशनच्या पाठीमागे वाहने असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत आले आहे. गवताला कशाची तरी आग लागली असावी त्यामुळे वाहनांनी पेट घेतला असा अंदाज स्थानिक कर्मचाºयांमधून लावला जात होता.
शेजारच्या खोलीतच गॅसच्या टाक्या...- पोलीस स्टेशनमार्फत बेकायदेशीर घरगुती स्वयंपाकाच्या जप्त करण्यात आलेल्या गॅस टाक्या आग लागलेल्या ठिकाणीच असलेल्या खोलीत ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ खोलीतील गॅसच्या टाक्या बाहेर काढून सुरक्षित जागी हलवल्या.
आग लागल्यानंतर धुराचे लोळ आकाशात दिसू लागले, आजूबाजूला असलेली पोलीस वसाहत व अन्य ठिकाणच्या लोकांनी मोठी गर्दी केली. लोक शेजारच्या इमारतीवरून व भिंतीवर उभे राहून आग पाहत होते. आगीत आतमध्ये असलेली मोठी झाडेही जळाली. मोटरसायकली जळताना टायर फुटण्याचे आवाज येत होते. गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या या मोटरसायकलींमध्ये पेट्रोल नसल्याने स्फोट झाला नाही.
सकाळी ११.१५ वाजता अग्निशामक दलास सदर बझार पोलीस ठाण्यातून फोन आला. तत्काळ दोन पाण्याच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. एकूण ५ गाड्यांनी पाण्याचा मारा केला आहे. आग आटोक्यात आली असून, त्याचे कारण समजले नाही. - केदार आवटेअधीक्षक, अग्निशामक दल