सोलापूर: सकाळची वेळ. मुलांनी एव्हाना शाळेच्या गेटमधून प्रवेश केला होता..वर्गात बेंच पकडताना त्यांचा गोंगाट सुरू झालेला..इतक्यात कोकीळेचं आर्त केकाटनं कानी पडू लागलं. पिंपळाच्या झाडावर माजांत अडकून ती जखमी झाली होती..उंच झाड, तिला सुरक्षित उतरवणं थोडं कठीण..मग अग्निशामक जवान आले अन त्यांनी अलगद तिला जीवनदान दिलं.
मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा कॅम्प शाळेसमोरील पिंपळाच्या झाडावर मांज्यामध्ये कोकिळेचा एक पाय अडकलेला होता. सकाळपासून मांज्यातून स्वतःची सुटका करण्याचा कोकिळेने अतोनात प्रयत्न केला. पण मांज्यामध्ये कोकिळेचा पाय गुंतलेला असल्याने बाहेर पडता येईना. कोकिळेचा जीव खूप तडफडत होता. शिक्षकांनी आवाज ऐकून कोकिळेचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण झाडाच्या वरच्या शेंड्यावर असल्याने यश आले नाही.
तात्काळ सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दल शाखा गुरुनानक चौक यांना पाचारण केलं व त्यांच्या सहाय्याने कोकिळेला मांज्यातून सुटका मिळाली. यासाठी अग्निशमन दलाचे शामराव कोरे ,हनमंत कोंकल ,मन्सूर शेख ,कृष्णा इरकल यांनी मांज्यातून अलगदपणे कोकिळेची सुटका केली.यासाठी शाळेतील शिक्षक धोंडू केंगले ,राहुल नवले व आप्पासाहेब ककमारे यांनी परिश्रम घेतले. या कामाचे शाळेचे मुख्याध्यापिका रेहाना नदाफ यांनी कौतुक केले.