मला लहानपणापासूनच आकाश आणि आकाशातील असलेल्या सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, चांदण्या आणि इतर अनेक सूर्य मालिकेबद्दल प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. अनेकदा मला आपले आकाश एक गूढ आहे असे वाटते. आकाशातील चंद्र, तारे आणि चांदण्यांकडे पाहताना मनात अनेक प्रश्न, शंका आणि विचार येत असत. या सर्वांचे उत्तर मी भूगोलाची पुस्तके आणि माझ्या शिक्षकाकडून काढत असे. यातून अनेक प्रश्नाचे मला समाधान मिळायचे तर काही प्रश्न गूढच राहायचे. अनेक वर्षे मी आकाशातील ग्रहण, उल्कापात, सुपरमून अशा सर्व घटना पाहत आलोय. मी जेव्हा जेव्हा आकाश या विषयावर विचार करतो तेव्हा मला एकच गोष्ट समजलेली आहे ती म्हणजे आपली कल्पनाशक्ती इथे थकून जाते.
पाच एक वर्षांपूर्वी मी ‘नॉरदन लाईट्स’(अ४१ङ्म१ं ुङ्म१ीं’्र२) या विषयावर एक लेख वाचला होता आणि डिस्कव्हरी चॅनलवर एक डॉक्युमेंटरीसुद्धा पाहिली होती. तेव्हापासूनच आकाशातील अशा नैसर्गिक प्रकाशाच्या आतषबाजीबद्दल मला प्रचंड कुतूहल होते आणि मनाशी ठरविले की ‘नॉरदन लाईट्स’ पाहण्यासाठी उत्तर ध्रुवाजवळ जायचेच.
नॉरदन लाईट्स हे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील वायू आणि सूर्याच्या वातावरणातील प्रभारित कणांच्या घर्षणाने निर्माण होतात. सामान्यत: हे लाईट्स हिरवे, पिवळे रंगाचे दिसतात. हे लाईट्स आपल्या डोळ्यांना उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर रात्री पाहावयास मिळतात.
नॉरदन लाईट्स हे प्रमुख उद्देश ठेवून हिवाळ्यात स्कॅन्डेनेव्हियाची २१ दिवसांची टूर हिवाळ्यात आखली कारण हिवाळ्यात उत्तर ध्रुवावर फक्त ४ तासांचा दिवस आणि २० तास रात्र असते, जेणेकरून नॉरदन लाईट्स व्यवस्थित पाहता येतील. नासा या संस्थेच्या संकेतस्थळाचा अभ्यास करूनच प्रवासाला सुरुवात केली. नॉरदन लाईट्ससाठी नॉर्वे या देशातील उत्तर ध्रुवाजवळील ट्रॉम्सो आणि अल्टा येथे ४ रात्र मुक्काम केले.
आम्ही जेव्हा ट्रॉम्सो येथे पोहोचलो तेव्हा तेथे प्रचंड हिमवृष्टी होती. पहिली रात्र तर मला नॉरदन लाईट्स दिसलेच नाही कारण आकाशात ढग आणि जोरदार हिमवृष्टी होती. थोडासा निराश झालो. दुसºया दिवशी सकाळी मी गावापासून २० कि मी अंतरावर नॉरदन लाईट्सचे छायाचित्रे काढण्यासाठी उत्तम जागा निवडली. रात्री कारने या जागी जाऊन उभे राहिलो. वातावरण खूप थंड, तापमान उणे १८ डिग्री सेल्सिअस, जोराचा वारा, पायात दीड फूट बर्फ, आकाशात ढग आणि जोरदार हिमवृष्टी होती. काही वेळानंतर हिमवृष्टी थांबली. मी कारमधून बाहेर येऊन माझा कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला आणि काही क्षणात सर्व ढग सरकल्याने संपूर्ण आकाश स्पष्ट दिसू लागले. आकाशातील तारे आणि चांदण्याचा झगमगाट जणू काही आकाशात चांदण्याचा सडाच पडला होता असा भास होत होता. १५ मिनिटे उलटताच आकाशात मला नॉरदन लाईट्स दिसायला लागले. आकाशात हिरवा आणि फिक्कट पिवळा या दोन रंगाचे वेगवेगळ्या छटा दिसू लागल्या जणू काही आकाशात सूर्यकिरणांची आतषबाजी होत होती. नजरेला भुरळ आणि मनाला मोहात पाडणारी ही आतषबाजी म्हणजे निसर्गाने दिलेली एक पर्वणीच होती.
मन भरून हे लाईट्स पाहिल्यानंतर मी हे दृश्य कॅमेºयात टिपण्यास सुरुवात केली. नॉरदन लाईट्सचे छायाचित्रे काढणे खूप कठीण आणि आव्हानात्मक असते. यासाठी मी एक महिना रोज रात्री कॅमेºयाच्या सेंटीग्सचा अभ्यास आणि सराव केला होता. ही छायाचित्रे काढण्यासाठी मी कॅनान ५ डी मार्क ४ आणि २४ एमएम प्राइम लेन्स, कॅमेराचा आपर्चर १२ सेकंड, आयएसओ ६००, आॅटो शटर स्पीड, रिमोट बटन आणि ट्रायपॉडचा वापर केला. एक महिन्याचा केलेला सराव उपयोगी आला आणि दुसºया क्लिकला मला नॉरदन लाईट्स उत्तम छायाचित्र टिपायला मिळाले. टिपलेली सर्व छायाचित्रे पाहिल्यानंतर मन तृप्त आणि आनंदी झाले.
नॉरदन लाईट्स पाहायचं एक स्वप्न पूर्ण झालं आणि मला मिळालेला हा अनुभव माझ्या स्मरणात कायमस्वरूपी राहिला आहे. असेच माझे काही अविस्मरणीय अनुभव मी पुढील भागात सांगेन.- डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ अन् छायाचित्रकार आहेत.)