Assembly Election 2024 ( Marathi News ) : विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी मतदारांच्या तब्येतीची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट असणार असून ठराविक केंद्रावर रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 'लोकमत'शी बोलताना दिली. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ७३८ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर जिल्हा परिषदेच्यावतीने विविध सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत. केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, व्हिलचेअर, टेबल, खुर्चा यासह अन्य गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा मतदानाच्या दिवशी दिवसभर राबणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी परिश्रम घेत आहेत.
प्रथमोपचार पेटीत हे असणार
प्रत्येक केंद्रावर देण्यात आलेल्या प्रथमोपचार पेटीत पॅरासिटामोल गोळ्या, बॅन्डेज, कॉटन, डस्टिंग पावडर, रोलर बॅन्डेज, क्रिम, कॉटन, डेटॉल, सिरिज, पट्टी, क्रीम (सोफ्रामाइसिन), क्रेप पट्टी, पांढरी पट्टी आदी विविध साहित्य असणार आहे. जर कोणाला लागले, खरचटले, रक्त आले, इजा झाली तर या प्राथमिक उपचार पेटीतील साहित्यांचा वापर करण्यात येणार आहे. जर कोणाला जास्त त्रास होत असेल तर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्या मतदाराला आरोग्य केंद्र किंवा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
डॉक्टर अन् रुग्णवाहिका तैनात
मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र १०८, १०२ व अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर आवश्यक मनुष्यबळ, औषधांचा साठा उपलब्ध असणार आहे. डॉक्टर, नर्सेस, आशा स्वयंसेविका, आशा वर्कर, परिचारिका यांचीही दिवसभर मतदान केंद्रावर सेवा असणार आहे.
जिल्हा परिषदेचे अधिकारी देणार केंद्रांना भेटी
मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या सेवासुविधांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह अन्य अधिकारी हे मंगळवार व बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार कर आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण केंद्रावर भासणार नाही याबाबत जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्याही मतदारांना मतदान केंद्रावर अडचण भासणार नाही. आरोग्य विभागाने प्रथमोपचार किट ठेवले आहे. शिवाय ठराविक केंद्रांवर रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. आमच्या विभागाचे डॉक्टर्स, नर्सेस, परिचारिका याही केंद्रावर कार्यरत असणार आहेत. मतदान केंद्रावर आरोग्याच्या सेवासुविधा दिवसभर उपलब्ध असणार आहेत. - डॉ. संतोष नवले,जिल्हा परिषद, सोलापूर