पंढरपूर : भारतात कोरोना संसर्गजन्य रोगाची तिसरी लाट जुलै व ऑगस्ट दरम्यान येईल, असे तज्ज्ञ मंडळींकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पंढरपुरातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाबाधित बालकांसाठी महाराष्ट्रातील पहिले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर पंढरपुरातील नवजीवन बालरुग्णालयात सुरू करण्यात आले आहे.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते. यामुळे पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तहसीलदार सुशीलकुमार बल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, वैद्यकीय अधिक्षक अरविंद गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले यांनी आढावा घेऊन तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी चालवली आहे.
ज्या रुग्णालयात पॅथॉलॉजी लॅब, डिजिटल एक्स-रे उपलब्ध होऊ शकतात, तसेच योग्य आरोग्य यंत्रणा आहे. अशा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर उपचार करण्यासाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहेत. शहरातील बालरोग तज्ज्ञ शीतल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयात १५ बालकांसाठी तर डॉ.श्रीकांत देवकते यांचा चिरंजीव रुग्णालयात दहा बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे, तसेच कोरोना पॉझिटिव्ह असताना, जन्म दिलेल्या बालकाला स्वतंत्र ठेवण्याची सुविधा नवजीवन बाल रुग्णालयात करण्यात आली आहे.
---
वॉररूमच्या माध्यमातून योग्य माहितीचा पुरवठा
कोरोनाच्या रुग्णांना व नागरिकांना आरोग्याबाबत योग्य ती माहिती देण्यासाठी माहिती देण्यासाठी प्रांत अधिकारी कार्यालयात वॉररूम सुरू केली आहे. तेथून रॅपिड टेस्ट सुरू असलेली ठिकाणे, रुग्णवाहिका, प्लाझ्मा डोनेट व अन्य माहिती देण्याचे काम कोविड वॉरिअर्स करत असल्याचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
---
तालुक्यात ३० विलगीकरण केंद्र
बाधितांना घरात विलगीकरण करणे शक्य नाही. यामुळे तालुक्यात ३० ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात एकूण ८५० बेड, शासकीय ठिकाणी ५०० बेड तर कोविड केअर सेंटरमधील ३०० बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.