सोलापूर : आपण ज्या देशात राहतो, त्या भारत देशाचे आपण नागरीक आहोत. त्यामुळे सर्वप्रथम आपण भारतीय आहोत याच भान ठेवा, त्यानंतर आपला धर्म पाळा. प्रत्येक धर्मियांशी बंधुत्वता कायम ठेवा असा संदेश मौलाना सय्यद महंमद फजलुल्ला खतिब यांनी दिला.
बकरी ईद निमित्त जुनी मिल कंम्पाउंड परिसरातील अली आदीलशाही ईदगाह मस्जिद येथे आयोजित करण्यात आलेल्या नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांना उद्देशून ते बोलत होते. सकाळी ८ वाजल्यासून मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येत होते. मस्जिद व बाहेरील परिसरात सोबत आणलेले मॅट टाकून बसत होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मौलाणा सय्यद महंमद फजलुल्ला खतिब यांनी नमाज पठणाला सुरूवात केली.
मुस्लिम बांधवांनी मोठ्या श्रद्धेने नमाज पठण केले. ९.३० वाजता मौलाना यांनी संदेश देण्यास सुरूवात केली. इब्राहिम अहले सलाम, ईस्माईल अहले सलाम यांच्या आठवणीमध्ये ही ईद साजरी केली जाते. सर्व समाज बांधवांनी मिळून मिसळून एकतेने राहिले पाहिजे. कोणताही भेद भाव मनात ठेवला नाही पाहिजे. आपल्या शेजाऱ्यांसोबत चांगली वर्तणूक ठेवा. प्रत्येकाने स्वत:च्या मनात देशाभिमान ठेवला पाहिजे असा संदेश उपस्थित मुस्लिम बांधवांना दिला. यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.