सोलापूर : उत्तर सोलापूर तहसीलदारांचा पदभार हणमंत कोळेकर यांनी घेतला खरा, परंतु पहिला दिवस तुंबलेल्या दाखल्यांवर सह्या करण्यात व कर्मचाऱ्यांच्या बैठकीतच गेला.अनिल कारंडे हे अचानक रजेवर गेल्याने चार दिवस उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांची खुर्ची रिकामीच होती. कोणीच तहसीलदार नसल्याने संपूर्ण काम ठप्प झाले होते. किमान सेतूच्या दाखल्यांवर सह्या तरी होणे आवश्यक होते, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. करमणूक कर शाखेचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्याकडे गुरुवारी हा पदभार दिला होता. शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेपूर्वीच कोळेकर यांनी तहसील कार्यालय गाठले. त्यांनी लागलीच कामाचा आढावा सुरू केला. कोणावर काय जबाबदारी आहे?, याची माहिती घेत त्यांनी वेळेनंतर कार्यालयात येणाऱ्यांना लेट कमरची शिक्षा दिली. कामाची जाणीव ठेवून कामाची पद्धतही त्यांनी कर्मचाऱ्यांना समजावून सांगितली. आपल्याकडील काम वेळच्या वेळी करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. काही वेळ कर्मचाऱ्यांच्या बैठकीत गेल्यानंतर त्यांना सेतूमधील दाखल्यांवर सह्या करण्याचे मुख्य काम करावे लागले. -------------------------------------‘लेट मस्टर’ प्रथमच ठेवलेवेळेवर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सह्या झाल्यानंतर मस्टर जमा करुन उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘लेट मस्टर’ असणे आवश्यक आहे. परंतु उत्तर तहसील कार्यालयात लेट मस्टरच नव्हते. ते शुक्रवारी ठेवण्यात आले. गारपीट अनुदानाच्या याद्या करण्याच्या सूचना देत सोमवारी दप्तर तपासणी करणार असल्याचे तहसीलदार कोळेकर यांनी कर्मचाऱ्यांना बजावले. उत्तर तालुक्यातील जनतेच्या कामांकडे पाहण्यास तहसीलदारांना वेळच मिळत नाही. सेतूमधील दाखल्यांवर सह्या करणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांना उपस्थित राहणे व शहरातच तहसीलदार रमत आहेत. ग्रामीण भागात ना तहसीलदार ना तलाठी रमत असल्याचे चित्र आहे. शहरातच अनेक तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांचा ठिय्या आहे. त्यामुळे हे तहसीलदार तरी ग्रामीण जनतेसाठी वेळ देतील का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पहिला दिवस... पेंडिंग दाखल्यांवर सह्यांसाठी
By admin | Published: June 08, 2014 12:48 AM