सोलापूर : अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत गुरुवारी संपली. गुरुवारपर्यंत विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखेतून जवळपास ३५ हजार अर्ज आले आहेत. यात विज्ञान शाखेसाठी शहरात ५ हजार १६० जागा असून, यासाठी २० हजार ७७१ अर्ज आले आहेत. यानंतर वाणिज्य शाखेसाठी अर्ज आले आहेत.
यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन राबविण्यात येत आहे़ यासाठी सर्व महाविद्यालयांना संकेतस्थळ अथवा लिंक तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ सोलापूर शहरात अकरावीच्या एकूण ६२ महाविद्यालये आहेत. यातील ५६ शाळांनी अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांची माहिती दिली आहे़. वाणिज्य शाखेचे शहरात ३ हजार ७२०, जिल्ह्यात ३२४० जागा आहेत़ यात शहरातील जागांच्या जवळपास तिप्पट अर्ज म्हणजे ९ हजार ७०७ प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत आणि शहरात कला शाखेचे ५ हजार ४४० जागा असून, त्यासाठी ४ हजार १२६ म्हणजे जागांपेक्षा अर्ज कमी आले आहेत.
शहरात विज्ञान शाखेसाठी वालचंद महाविद्यालयात सर्वात जास्त ६ हजार ११८, दयानंद महाविद्यालयात ३ हजार ५० आणि संगमेश्वर महाविद्यालयात २ हजार ५५२ व त्यानंतर ए़ डी़ जोशी महाविद्यालयात १ हजार ७४१ अर्ज दाखल झाले आहेत़ तर वाणिज्य शाखेसाठी हिराचंद नेमचंद महाविद्यालयात ३ हजार ४०, डी़ ए़ व्ही. महाविद्यालयात १ हजार ३६१ आणि संगमेश्वर महाविद्यालयात १ हजार ५४६ अर्ज आले आहेत.
याप्रमाणे जाहीर होणार गुणवत्ता यादी...राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला. यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी ३१ जुलै ते १३ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत होती़ १४ ते १९ पर्यंत महाविद्यालय स्तरावर अर्जांची छाननी होणार आहे़़ २० आॅगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी, ३१ आॅगस्ट रोजी दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे़