सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी देशातील प्रमुख राज्यातील उमेदवारांची यादी गुरूवारी सायंकाळी घोषीत करण्यात आली. या यादीत महाराष्ट्रातील १५ जणांचा समावेश आहे मात्र सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्याप घोषित केली नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही़ राष्ट्रवादीतर्फे माढा मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव चर्चेले जात होते़ पण त्यांनी चिरंजीव रणजितसिंह यांना उमेदवारी द्यावी म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे पाठपुरावा केला होता़ पण प्रतिसाद न मिळाल्याने ऐनवेळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपची वाट धरली़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराजी असल्याने उमेदवार बदलण्याच्या चर्चेला ऊत आला आहे. सध्या संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे नाव घेतले जात आहे. नेमके आजच त्यांनी भाजपातर्फे अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर हजेरी लावली अन मौन व्रत तोडून भाषणही केले.