कऱ्हाड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या मेडिकल अधिविभागातील एम. बी. बी. एस. च्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘क्षितीज’ या शॉर्टफिल्मला मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. या शॉर्टफिल्मने यापूर्वी झालेल्या विविध राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्येही घवघवीत यश मिळविले आहे.मुंबई येथील जे. जे. मेडिकल कॉलेज आणि जी. एस. मेडिकल कॉलेजने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील शाटॅफिल्म स्पर्धेत या लघुपटाला प्रथम क्रमांक मिळाला असून, मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. तसेच यापूर्वी मुंबईच्याच नार मेडिकल कॉलेजतर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत या लघुपटाला प्रथम, तर लोकमान्य मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन एम. बी. बी. एस.च्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या कपिल मोरे या विद्यार्थ्याने केले आहे. तसेच पार्श्वसंगीतही त्यानेच दिले आहे. लघुपटातील कलाकारांची रंगभूषा, केशभूषा विद्या लावंड व सोनाली जुन्नरकर यांनी केली आहे; तर इंग्रजीतील उपशिर्षके आदेश फाटक याने दिली आहेत. लघुपटाचे छायाचित्रण महाविद्यालाच्या आर्ट अॅण्ड फोटोग्राफी विभागाचे हेमंत उणउणे यांनी केले असून, कपील मोरे, अभिषेक साळुंखे, सत्यजित पाटील, सागर राऊत या विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या आहेत. विद्यार्थ्यांना कृष्णा मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी) लघुपटातून सामाजिक संदेशवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे केवळ पैसे कमाविण्यासाठीच डॉक्टर होतात, अशी धारणा समाजाची असते; पण समाजाचा हा समज पूर्णपणे चुकीचा असून, रुग्णसेवा हेच डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य असते. काही डॉक्टरांच्या चुकीच्या कृतीमुळे सर्वांनाच बदनाम व्हावे लागते. हा दोष दूर करण्यासाठी डॉक्टरांनीच पुढाकार घ्यायला हवा, असा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम ‘क्षितीज’ लघुपट प्रथम
By admin | Published: April 06, 2015 9:50 PM