शुक्रवारी सकाळी रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर शहरात नागरिकांचे खूप हाल झाले. अनेकांची वाहने चिखलामुळे रस्त्यात अडकून पडली. त्यामुळे अनेकांनी ‘आपली कुर्डूवाडी’ या व्हाॅट्सॲप ग्रुपद्वारे सोशल मीडियावर नगरपालिकेच्या कामकाजांबाबत तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या. दिवसभर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर, गल्लीबोळांत पायी चालणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
शहरातील एस.टी.स्टॅण्डजवळील कॅनाल गटार पूर्ण भरले होते. त्या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पोस्ट रोडजवळ भुयारी गटारांसाठी खणलेली चारी नीट न बुजवल्यामुळे खचून जाऊन परत मोठा खड्डा पडला. वाहनधारकांना तेथून जाताना कसरत करावी लागली. भय्याच्या रानात अनेक झाडे पडली. सिद्धेश्वरनगर, साई काॅलनीत पाणी साचून रहिवाशांच्या घरात घुसले. मार्केट यार्डात पाणी साचल्याने भाजीविक्रेत्यांचीही मोठी तारांबळ उडाली. टेंभुर्णी रोड गोल काडादीचाळ व नेहरूनगर अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
---
कुर्डूवाडी रेन०१,०२