आॅनलाइन लोकमत सोलापूरमहेश कुलकर्णीसोलापूर : राज्यात रिक्षाचालकांच्या अनेक संघटना आहेत. त्यांच्यासाठी प्रशासनाने केलेले अधिकृत थांबेही आहेत, परंतु एखाद्या संघटनेने रिक्षाचालकांच्या सोयीसाठी भवन उभारणे, ही गोष्ट मात्र नवीन आहे. सोलापुरातील वंदेमातरम रिक्षा संघटनेने मोदीखाना परिसरात आठ लाख रुपये खर्चून रिक्षा भवन उभे केले आहे.रिक्षाचालकांना आपल्या व्यावसायिक आणि खासगी क्षेत्रातील अनेक अडचणींना दररोज सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सर्वांना एकत्र आणण्यासाठी काही प्रयत्न करता येतील का, याविषयी आम्ही सर्वांनी विचार करण्यास सुरुवात केली. यातून आपल्या संघटनेसाठी एक छोटेखानी भवन असावे, अशी कल्पना सुचल्याचे अध्यक्ष सिद्राम चोपडे यांनी सांगितले. यासाठी जागा आणि पैशांच्या गरजेची पूर्ती करण्यासाठी आम्ही या मतदारसंघातील आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे गेलो. त्यांना ही अभिनव कल्पना आवडली आणि त्यांनी स्वत:च्या आमदार निधीतून सात लाख रुपये देण्याचे मान्य केले आणि दिलेही. उर्वरित रक्कम आम्ही रिक्षाचालक आणि लोकवर्गणीतून जमा करून हे भवन पूर्ण केले.२००२ साली स्थापन केलेल्या वंदेमातरम रिक्षाचालक संघटनेचे २५० सभासद असले तरी सोलापुरात एकूण ८ हजारांच्या आसपास रिक्षाचालक आहेत. केवळ वंदेमातरम् संघटनेच्या सदस्यांसाठी नाही तर शहर आणि जिल्ह्यातील सर्वच रिक्षाचालक संघटनेसाठी हे भवन वापरता येणार आहे. हे भवन केवळ व्यावसायिक कारणासाठी नसून ते सामाजिक कारणासाठीही वापरण्यात येणार आहे. गरीब रिक्षाचालकांच्या पाल्यांना संघटनेच्या वतीने शालेय शिक्षणासाठी मदत, प्रशिक्षण, रक्तदान शिबीर असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. रिक्षाचालकांना प्रशासन आणि आरटीओ कार्यालयातील नियमांबाबत येथे मार्गदर्शन करण्यात येणार असून कागदपत्रांच्या पूर्ततेसंदभार्तील सर्व अडचणी दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे चोपडे यांनी सांगितले. -----------------गुरुपौर्णिमेचा मुहूर्तराज्यातील अभिनव अशा पहिल्या-वहिल्या रिक्षाभवनाचे उद्घाटन आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ९ जुलै रोजी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर करण्यात येणार असून या कार्यक्रमाला नगरसेवक फिरदोस पटेल, मीनाक्षी कंपली यांच्यासह प्रादेशिक उपपरिवहन कार्यालयातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.-----------------सामाजिक उपक्रमांद्वारे रिक्षाभवनाचे लोकार्पण करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर वंदेमातरम् रिक्षा संघटनेमार्फत अन्नदान सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला सात निराधार व गरिबांना संघटनेच्या वतीने एक वेळ जेवण पुरविण्यात येणार आहे.- सिद्राम चोपडेसंस्थापक अध्यक्ष, वंदेमातरम् रिक्षाचालक संघटना
सोलापुरात साकारले राज्यातील पहिले रिक्षाभवन
By admin | Published: July 08, 2017 11:07 AM