बंडोपंत कुलकर्णी
वडवळ : यंदा वडवळवासीय करणार असलेला शिवजयंतीचा सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे. ‘एक गाव-एक शिवजयंती’ हा नारा देत यंदाची शिवजयंती साजरी होणार असल्याने अख्खे गावच या उत्सवाच्या तयारीत गुंतल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून, यंदा विधवा महिलांच्या हस्ते शिवप्रतिमेची स्थापना करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सामाजिक परिवर्तनाची नांदी असलेला हा पायंडा शिवचरित्राची ख्याती सर्वदूर पोहोचविणारा ठरणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनपर कार्यक्रम, महिलांसाठी व्याख्यान, वृक्षारोपण, वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धा यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
चुकीच्या पद्धतींना फाटा देण्याचा विडा येथील तरुणांनी उचलला आहे. फक्त नाव शिवरायांचे आणि वागणे विरुद्ध असा प्रकार नको, या मतावर सारेच तरुण ठाम आहेत. त्यामुळे डीजे लावून नाचण्याचा प्रकार मोडीत निघत आहे. राजकारण, मतभेद अशा गोष्टी टाळत सर्व जातीधर्माच्या लोकांनी सामील होऊन शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार केला आहे. या सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळात कोणीही अध्यक्ष, प्रतिनिधी नाही. प्रत्येक जण पद न पाहता स्वत:ला शिवरायांचा मावळा समजून झटत आहे.
आदर्श शिवजयंती- दररोज जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमास सुरुवात केली जाते. वडवळ येथे गेल्या वर्षापासून गावातील सर्वच तरुणांनी, ग्रामस्थांनी एकत्र येत एकमुखी निर्णय घेऊन ‘एक गाव-एकच शिवजयंती’ साजरी करण्यास प्रारंभ केला. तरुणांच्या या आवाहनाला प्रतिसाद तर मिळालाच; सोबतच व्याख्यानमाला, वेशभूषा स्पर्धा, व्यसनमुक्ती, डीयेबंदी यांसारखे उपक्रम ‘आदर्श शिवजयंती’ म्हणून पाळण्यात आले. हाच निर्धार कायम ठेवत यावर्षी देखील विधवा महिलांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे.