कोरोनाच्या दोन लाटेत अक्कलकोट तालुक्यात २०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे आहे. हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात ३००हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. अनेक रुग्णांची तपासणी करण्यापूर्वीच ते मृत्यू पावले. काहीजणांचा आजार अंगावर काढल्याने मृत्यू झाला आहे. अशा अनेक कारणाने नोंदी होण्यास अडचणी येत आहेत. याबरोबरच सोलापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची तत्काळ कार्यवाही होऊन अक्कलकोट कार्यालयात वेळेत नोंदी होणे आवश्यक असते. हे होत नसल्याने आकडेवारीचे घोळ कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिल्या लाटेतील मृत्यूची वयोमर्यादा पाहता या लाटेत केवळ ज्येष्ठांना फटका बसल्याचे दिसून आले आहे. तेव्हा मृत्युसंख्याही केवळ ७२ होती. यंदा तब्बल १३१ जणांचे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ५० वर्षांआतील तरुणाचे आकडा ४९ झाला आहे. त्यामध्ये १८ महिला असून ३१ पुरुष आहेत. दुसऱ्या लाटेतील रुग्णांना लक्षणे पहिल्या लाटेपेक्षा वेगळे होते. यामुळे अनेकजण लागण झाल्यानंतर गाफील राहिले. यातूनच ते मृत्यूच्या दाढेत ओढले गेले आहेत.
-----
दुलर्क्षामुळे मृत्यू वाढतोय
पहिल्या लाटेपेक्षा यंदा कोरोना आजार अंगावर काढणाऱ्यांचे प्रमाण अधिक होती. आजही रुग्णसंख्येत घट झाली असलीतरी मृत्युदर कमी होताना दिसत नाही. कोरोनाची लागण झाल्याबरोबर तपासणी करून घेणे, उपचार करून घेणे. याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच यंदा ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेणेही महागात पडल्याचे सांगण्यात येत आहे.
---
तालुक्यात वेळेवर उपचाराची सोय असतानाही बरेच रुग्ण घरात बसून आजार अंगावर काढत होते. यामुळे रुग्ण गंभीर होत गेले. त्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. वेळीच रुग्णांची थोडीफार लक्षणे जाणवताच रुग्णालयात पोहचून उपचार करणे गरजेचे आहे.
- डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी, अक्कलकोट
----