बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात पद्मशाली समाज विशेष जागा राखून आहे़ सोलापूर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत तब्बल आठ वेळा समाजाने महापौरपद भूषवले आहे़ भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीकांचना यन्नम यांची महानगरपालिकेत महापौरपदी निवड झाली. त्यानंतर समाजातून मोठा आनंद व्यक्त होत आहे.
जनार्दन कारमपुरी यांनी मार्च १९९८ साली महापौरपद भूषवले होते़ त्यांच्या पश्चात महापौरपदाकरिता समाजाला दोन दशकांची वाट पाहावी लागली़ तब्बल २१ वर्षांनंतर यन्नम यांच्या रूपाने पद्मशाली समाजाला महापौरपदाचा मान मिळाला आहे़ त्यामुळे समाजाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
सोलापूरचे पहिले इलेक्टेड महापौरपदाचा मानदेखील पद्मशाली समाजाला मिळालेला होता़ कै. इरपण्णा बोल्ली हे पहिले इलेक्टेड महापौर होते़ त्यापूर्वी शासन नॉमिनेटेड महापौर कार्यरत होते़ कै. बोल्ली यांच्यानंतर पद्मशाली समाजातील अनेकांना महापौरपद मिळत गेले़ १९९५ साली तत्कालीन काँग्रेसचे नेते महेश कोठे यांना अवघ्या ३१ व्या वर्षी महापौरपद मिळाले़ याच पद्मशाली समाजातील अनेक नेते पुढे खासदार, आमदार यासह इतर अनेक मानाचे पद देखील भूषवले़ महापौरपदावर बसण्याची समाजाची एक परंपरा होतीच.
गेल्या काही वर्षात या परंपरेला ब्रेक लागला़ यामुळे समाज बांधव सर्वच राजकीय पक्षांवर काहीसे नाराजही होते़ पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौरपदाची मागणी जोर धरली़ समाज बांधव पदाकरिता पक्षाच्या श्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरू केला़ यापूर्वीच यन्नम यांना महापौरपद मिळायला हवे होते, अशी समाज बांधवांची भावना होती़ त्यांच्याऐवजी लिंगायत समाजाच्या शोभा बनशेट्टी यांना महापौरपद मिळाले़ त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी समाज दुखावला गेला़ समाजावर अन्याय झाल्याची भावना उचल खाल्ली़ तेव्हापासून समाजाकडून पाठपुरावा सुरु राहिला.
यापूर्वीचे सर्वच पद्मशाली महापौर हे काँग्रेस पक्षाचे होते़ अपवाद फक्त प्रा़ पुरणचंद्र पुंजाल यांचा, ते १९८५ साली पुलोदकडून महापौर झाले़ महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे़ या तुलनेत भाजपला फारसी संधी मिळालेली नाही़ त्यामुळे भाजपलाही पद्मशाली समाजाला न्याय देता आले नाही़ अनेक वर्षांनंतर भाजपची सोलापूर महानगरपालिकेत सत्ता आली आहे.
या पार्श्वभूमीवर समाज देखील एक झाला़ त्यांनी राजकीय जोर लावला़ दोन्ही देशमुखांनी सकारात्मकता दर्शवल्यानंतर यन्नम यांचा मार्ग सुकर झाला़ भाजपकडून पहिल्यांदाच पद्मशाली समाज बांधवास तेही समाज भगिनी या पदावर गेल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचाही आनंद झाला आहे़ दोन्ही देशमुखांना धन्यवाद देण्याचे काम सोशल मीडियाद्वारे सुरु आहे़यन्नम यांच्या निवडीमुळे समाजाला अनेक वर्षांनंतर न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया बांधवांकडून व्यक्त होत आहेत़
महापौरपद भूषवलेले पद्मशाली नेते, समोर वर्ष
- - कै. इरपण्णा बोल्ली : १९६९
- - कै. राजाराम बुर्गुल : १९७२
- - कै. सिद्रामप्पा आडम : १९७८
- - प्रा़ पुरणचंद्र पुंजाल : १९८५
- - धर्मण्णा सादूल : १९८९
- - महेश कोठे : १९९५
- - जनार्दन कारमपुरी : १९९८
- - श्रीकांचना यन्नम : २०१९