सोलापूर : ऐतिहासिक सर्वेक्षण करताना उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे इतिहास संशोधक नितीन अणवेकर यांना स्त्रियांचे आत्मसमर्पण शिल्प सापडल्यामुळे इतिहास संशोधनास नवी दिशा प्राप्त झाली आहे. हे जिल्ह्यातील स्त्रियांचे पहिले शिल्प असल्यामुळे या संशोधनास महत्त्व प्राप्त झाल्याची माहिती अणवेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अणवेकर यांनी जिल्ह्यातील सुमारे २३५ गावांचा ऐतिहासिक सर्व्हे केला असून, त्यांनी शिलालेख, शिल्प, मूर्ती, वीरगळ आदी दुर्मीळ शिल्पे उजेडात आणली आहेत़ नुकतेच वडाळा येथे स्त्रियांचे आत्मसमर्पण शिल्प सापडले आहे़ हे शिल्प दुर्मीळ असून साधारणत: तीन फूट उंच व दीड फूट रुंद आहे़ शिल्पपट दोन रकान्यात कोरलेला आहे. खालील रकान्यात मध्यभागी एका आसनावर एक स्त्री पद्मासन घालून बसलेली आहे. तिच्या दोन्ही बाजूस दोन स्त्रिया आहेत़ त्यांच्या डोक्यावरील अंबाड्यावरून स्त्री प्रतिमा स्पष्ट दिसते़ त्यांच्या डाव्या बाजूला असणाºया स्त्रीने तलवारीचा घाव घालून मध्यभागी बसलेल्या स्त्रीचे शरीर धडावेगळे केले आहे.
शिरविरहित मानेतून रक्ताची चिळकांडी उडत आहे़ या शिल्पाच्या उजव्या बाजूस दुसरी स्त्री कापलेले शिर एका ताटात घालून डोक्यावरून घेऊन जात आहे़ ताटातील शिराच्या एका बाजूस अंबाडा दिसून येत आहे़ यावरून ही स्त्रीच आहे हे स्पष्ट होते, तर शिल्पाच्या वरील बाजूस दोन अप्सरा आहेत, असे शिल्पात दाखवले आहे़ अशी शिल्पे फारच तुरळक प्रमाणात आढळतात़ मनाचा थरकाप उडवून अंगावर रोमांच उभे रहावे, अशी काही भयावह व रक्तरंजित उदाहरणे इतिहासात फारच थोडी सापडतात, अशी माहिती नितीन अणवेकर यांनी दिली.
वडाळा येथे सापडलेल्या या शिल्पामुळे इतिहास संशोधकांच्या चर्चेचा विषय झालेला आहे़ या यशाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक आनंद कुंभार, पुरातत्त्व शास्त्र संशोधक डॉ़ सत्यव्रत नुलकर, डॉ़ राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा़ एम़ एम़ मस्के, डॉ़ श्रीकांत येळेगावकर, प्राचार्य के. एम़ जमादार, डॉ़ नभा काकडे यांनी अणवेकर यांचे कौतुक केले आहे.
नितीन अणवेकर यांना सापडलेले दुर्मीळ शिल्प म्हणजे अपूर्व उपलब्धी आहे़ यापूर्वी मंगळवेढा येथे अत्यंत देखणे व सुंदर शिल्प वृत्तासह सापडले आहे़ अशा शिल्पांना वेळेवाळी शिल्प म्हणतात़ आपल्या आश्रित राजाला युद्धामध्ये यश प्राप्त व्हावे, म्हणून स्वयंस्फूर्तीने स्वत:चे बलिदान करून घेणारे गट असत़ त्यांना त्या काळी लेंकरू असेही म्हणत़ वडाळा येथील शिल्प स्त्रियांचे असल्यामुळे हे शिल्प वैशिष्टपूर्ण म्हणावे लागेल़ - आनंद कुंभार, इतिहास संशोधक