मग गाळे बांधकाम.. आता सारेच रखडले
लोकमत न्यूज नेटवर्ककुर्डूवाडी : कुर्डूवाडी शहरातलं बालगोपाळांसह ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून एकमेव असलेल्या बालोद्यानचे काम रखडले आहे. याच बालोद्यानमध्ये सुरुवातीला शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे काम थांबले. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम सुरु झाले. तेही थांबले. मग नगरपालिकेने व्यापारी गाळ्यांचे काम सुरु झाले. यात दोन संघटनांच्या आक्षेप,आरोपांनी आता सर्वच काम थांबले आहे. यात बालोद्यानचे सुशोभीकरण मात्र रखडले आहे.
शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अहिल्यादेवी होळकर बालोद्यान सुशोभीकरणासाठी दोन महिन्यांपूर्वी ९८ लाख रुपयांचा निधी नगरपालिकेच्या खात्यात राज्य सरकारकडून जमा झाला. दरम्यान अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित काम हे इस्टिमेटप्रमाणे होत नसून नगरपालिका मनमानी पद्धतीने पुतळ्याच्या बाजूलाच व्यापारी वर्गांसाठी गाळे काढत असल्याचा आरोप केला. नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केल्याने हे काम रखडले. दरम्यान बालोद्यान परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी अनेक वर्षे झगडणाऱ्या युवा भीम सेना संघटनेने साठे यांच्या पुतळ्याकडील काम त्वरित सुरू करा, अशी मागणी केली. आता नगरपालिका द्विधा मन:स्थितीत आहे.
नगरपालिकेच्या वतीने संबंधित काम हे इस्टिमेटप्रमाणेच करीत असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारी गाळे बांधले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात बालोद्यानचे काम मात्र बंदच ठेवले आहे.
......
अनेक वर्षांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे सुशोभीकरण करा म्हणून आम्ही नगरपालिकेकडे भांडत आहोत. नगरपालिका या बागेत अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या बाजूला गाळे बांधत असल्याची तक्रार होळकर मध्यवर्ती समितीने केली आहे. हा वाद मिटेपर्यंत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे काम सुरू करा.
- नागेश आडसूळ
जिल्हा संघटक, युवा भीम सेना संघटना.
---
बालोद्यानात अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम नगरपालिकेकडून सुरू झाले होते; परंतु काम इस्टिमेटप्रमाणे होत नाही. येथे नगरपालिका गाळे बांधकाम करत आहे. त्यामुळे पुतळा बाहेरून दिसत नाही म्हणून काम बंद करण्याबाबत तक्रार दिली होती. सध्या काम बंद आहे.
- अभिजित सोलनकर, शहर अध्यक्ष, रासपा
--
कुर्डूवाडीतील बालोद्यानाचे सुशोभीकरण सुरू होते. त्यासाठी ९८ लाखांची तरतूद केली आहे; परंतु या कामाबाबत काही संघटनांचा आरोप झाल्याने ते बंद ठेवले आहे. यावर मुख्याधिकारी, नगराध्यक्ष निर्णय घेतील.
- वैशाली मठपती,नगर अभियंता, बांधकाम विभाग, कुर्डूवाडी
.......
फोटो : ०५ कुर्डूवाडी बालोद्यान