अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभरात राज्यासह देशविदेशांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यासाठी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य याची व्यवस्था बरोबरच वेळच्या वेळी विकास कामे होणे आवश्यक असते. यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे गरजेचे आहे. तेच या ठिकाणी होताना दिसत नाही. परिणामी विकास कामे खोळंबली आहेत. शहराच्या विकासाबाबत कठोर भूमिका घेणारे डॉ. प्रदीप ठेंगल हे मुख्याधिकारी म्हणून लाभले. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी नाराज होते. अखेर एका वर्षातच त्यांची शासनाने बदली केली. त्यानंतर दुसरे मुख्याधिकारी म्हणून आशा राऊत रुजू झाझ्या. चांगले काम करत असताना अचानकपणे बदली झाली. त्यांना ही एक वर्षाचा कालावधी मिळाला. कोरोना संसर्गाच्या काळा तिसरे मुख्याधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय राऊत यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. त्यांना केवळ एका महिन्याचा कालावधी मिळाला. चौथे मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. एक महिन्याच्या कालावधीत बाहेर कुठे नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले कधीच दिसले नाही. त्यानंतर मंत्रालयातून गणेश शिंदे यांची बदली अक्कलकोट येथे झाली. त्यांच्या मनासारखे ठिकाण मिळाले नसल्याने ते रुजूच झाले नाही. सचिवांचा मान न राखल्याने चिडून त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली.. त्यामुळे अखेर रुजू झाले. केवळ दोन महिन्याचा कालावधी पूर्ण न करताच बदली करून घेतले. एकंदरीत मागील सोळा महिन्यात तब्बल पाच मुख्याधिकारी बदलण्यात आले आहे.
रखडलेली विकासकामे
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सध्या तीन कोटी रुपये शिल्लक न. प. च्या उत्पन्नात भर पाडण्यासाठी विकासकामे करावे लागते. यात्रा अनुदान निधीतून देवळाच्या परिसरातून विकासकामे करणे, यासाठी १ कोटी ३० लाख निधी शिल्लक, उद्याने सुधारण्यासाठी दीड कोटी निधी शिल्लक आहे. अक्कलकोट ते शिवपुरी रस्त्यासाठी ८ कोटी,५० लाख रुपये निधी पडून आहे. स्वच्छ भारत अभियानमधून दीड कोटी रुपये निधी शिल्लक, शहरात विविध ठिकाणी मुतारी, सुलभ शौचालय बांधणे कामी दोन कोटी रुपये निधी शिल्लक आहे. असे १८ कोटींचा निधी शिल्लक अहेत,
नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले नाही. यामुळे विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता देणे, कार्यालयीन कामकाज सुरळीत चालणे, पंतप्रधान आवास , रमाई घरकुल योजनेचे बिले काढणे, नवनवीन प्रस्थाव पाठविणे, निविदा काढणे, नागरी समस्या सोडविणे, शहर स्वच्छता, प्रलंबित कामे मार्गी लावणे, अशा एक ना अनेक कामाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत.
कोट :
तीर्थक्षेत्र अक्कलकोटला कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे आवश्यक असते. मागील दहा महिने कोरोना व्हायरस, आचार संहिता, मुख्याधिकारी नसणे आशातच गेले. यामुळे विविध विकासकामांना खीळ बसत आहे. सध्या मुख्याधिकारी नसल्याने मुंबई येथे जाऊन संबंधित मंत्री महोदय यांना भेटून विनंतीपत्र देऊन आलेले आहे. लवकरच नवीन अधिकारी मिळतील अशी आशा आहे.
शोभा खेडगी, नगराध्यक्ष, नगरपालिका, अक्कलकोट