वडवळ : मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील एकूण पाच अंगणवाड्या कार्यरत असून, येथे मध्यम कमी वजनाची एकूण पाच कुपोषित बालके आढळून आली. आता त्यांचे पालकत्व ग्रामपंचायतीने घेतले आहे. कुपोषणमुक्त करण्यासाठी व अंगणवाडीला भौतिक सुविधा पुरवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सरपंच जालिंदर बनसोडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत १ ते ३० सप्टेंबर अखेर प्रकल्प, बीट व अंगणवाडी स्तरावर दशसूत्री कार्यक्रम सोलापूर जि.प.च्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या वतीने घेण्यात आला. याअंतर्गत ९ सप्टेंबर या एकाच दिवशी वडवळ गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांनी अंगणवाडींना भेटी देऊन तीव्र कमी वजनाची व मध्यम कमी वजनाची बालके शोधणे, अंगणवाडीना आवश्यक भौतिक गरजा याविषयी माहिती घेतली. यावेळी बालकांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी सरपंच जालिंदर बनसोडे, उपसरपंच धनाजी चव्हाण, ग्रा.पं. सदस्य श्रीकांत शिवपुजे, राहुल मोरे, शाहीर पवार, लक्ष्मण मळगे,
मंडळ अधिकारी साहिल नदाफ, तलाठी समाधान कांबळे, ग्रामसेवक तात्या नाईकनवरे, अंगणवाडी सेविका सुकन्या बनसोडे, छबुबाई वाघमोडे, मंजूषा बनसोडे, नागर मळगे,पुनराज शिखरे आदी उपस्थित होते.
-----
वडवळ येथील अंगणवाडीमध्ये भेटप्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व सर्व सेविका,मदतनीस.