पंढरपूर : मालक आणि कामगारांचे व्यावहारिक संबंध हे अल्पकालीन असू शकतात. मात्र, पंढरपुरात मालक-कामगारांमधील ऋणानुबंध यास अपवाद आहे, याचे कारण एकच ते म्हणजे ‘अगरबत्ती’ होय़ या अगरबत्तीमुळेच एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच पिढ्यांचे मालक अन् कामगारांचे ऋणानुबंध पाहावयास मिळतात.
एखादा व्यवसाय किती पिढ्या करायचा यालाही मर्यादा येतात़ मात्र, ताटे-देशमुख यांची पुढील पिढी त्याला अपवाद ठरली. केवळ अगरबत्तीमध्येच सध्या पाचवी पिढी कार्यरत आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वी तात्याबा कृष्णाजीराव ताटे-देशमुख हे पंढरपुरात कुंकू, बुक्का, अष्टगंध, धूप तयार करत असत. त्यांनी धूप व सुगंधी द्रव्ये वापरून अगरबत्ती बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे पुत्र नारायण तात्याबा ताटे-देशमुख यांनी धूप, चंदन, तेल, गुलाब अशा निरनिराळ्या सुगंधी वस्तूंचा वापर करून नवा फॉर्म्युला बनविला आणि ताटे डेक्कन क्वीन अगरबत्ती नावारूपाला आणली. त्यानंतर त्याच नावाने त्यांचे पुत्र गणपत नारायण ताटे-देशमुख, त्यांचे पुत्र शिवाजी गणपत ताटे-देशमुख, संभाजी ताटे-देशमुख आणि आता त्यांचे पुत्र सागर शिवाजी ताटे-देशमुख व शुभम ताटे-देशमुख ही ताटे-देशमुख कुटुंबातील पाचवी पिढी सध्या हाच अगरबत्तीचा व्यवसाय करताना दिसते.
अगरबत्ती बनविणे ही एक हस्तकला आहे. त्यासाठी मशीनचा वापर करता येत नाही़ वर्तमानकाळात मशीनद्वारेही अगरबत्ती बनविल्या जातात़ ताटे-देशमुख यांनी हस्तकलेद्वारे बनविल्या जाणाºया अगरबत्तीलाच प्राधान्य दिले़ तात्याबा कृष्णाजीराव ताटे-देशमुख यांच्या कार्यकाळात रखमाबाई रामभाऊ सोमवंशी या हस्तकलेद्वारे अगरबत्ती बनवित होत्या़ त्यानंतर त्यांची मुलगी सोनाबाई हरिभाऊ सोमवंशी, त्यानंतर त्यांची मुलगी मीराबाई रामचंद्र चव्हाण, त्यांच्या तीन मुली रंजना दादासाहेब शिंदे (वाखरी), अलका पांडुरंग सपाटे (तारापूर), आशा अरुण रणदिवे (मगरवाडी) या अगरबत्ती बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत. आता पाचव्या पिढीतील त्यांची सून मनीषा चव्हाण याही अगरबत्तीच बनवित आहेत.
मालक चांगला मिळाला, त्यांनी चांगली वागणूक देत कामगारांवर विश्वास दाखविला की, कामगारही कधी कामात खोटेपणा करीत नाहीत. ताटे-देशमुख मालक यांनी आम्हा कामगारांना कधी कामगाराप्रमाणे वागणूक दिलीच नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी वागणूक दिली़ त्यामुळे आम्हालाही वाटते काम केल्यानंतर पैसे कोणही देतो, पण मालकांकडे माणुसकी असली पाहिजे़ ती आम्हाला या ठिकाणी दिसली म्हणूनच पिढ्यान्पिढ्या एकाच ठिकाणी काम करीत आहोत़- मीराबाई रामचंद्र चव्हाण, महिला कामगार
या कामगारांनी आम्हाला कधी मालक समजलेच नाही़ त्यामुळे आम्हीही त्यांना कधी कामगार म्हणून वागणूक दिली नाही तर आमच्या परिवारातील सदस्य आहेत, असे समजलो़ शिवाय त्यांच्या सुख-दु:खात आम्ही सहभागी असतो़ केवळ या कारणामुळे पाच पिढ्यांपर्यंतचा हा मालक-कामगारांमधील ऋणानुबंध टिकला आहे़- सागर ताटे-देशमुख,पाचव्या पिढीतील मालक