येथील ग्रामसेवक टी. आर. पाटील (पालवन), टी. सी. मेहर (भोगेवाडी), के. एस. मोहिते (वरवडे), बी. आर. लोकरे (आढेगाव), आर. बी. वाकडे (केवड) या पाच ग्रामसेवकांना गेल्या मे महिन्यात ज्येष्ठतेनुसार ग्रामविकास अधिकारी पदाचे प्रमोशन मिळाले आहे. त्यामुळे त्यांना झेडपीचे सीईओंनी त्या सज्जाची गावे देण्यासाठी कुर्डुवाडी पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्याकडे वर्ग केले. परंतु त्यांना कोणते गाव कोणाला द्यायचे यावरून येथील दोन संघटनेचा अंतर्गत वाद सुरू झाला आहे. यामुळे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी त्यांना अद्यापपर्यंत सज्जाची गावेच दिली नाहीत. याची चर्चा मात्र संपूर्ण तालुक्यातील ग्रामसेवकांतून दररोज होत आहे. त्या ग्रामसेवकांना अद्यापही कोणतेच गाव मिळाले नसल्याने त्यांची पदोन्नतीची ऑर्डर पंचायत समितीच्या कार्यालयात आहे.
येथील उपळाई (खु), मोडनिंब, बारलोणी, भोसरे, पिंपळनेर, टेंभुर्णी, अंजनगाव (खे) ही ७ गावे ग्रामविकास अधिकारी या पदाच्या सज्जाची असून, ती रिक्त आहेत. यात टेंभुर्णी, मोडनिंबसारखी गावे कोणी घ्यायची यावरून गोंधळ उडालेला आहे. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत एखादे प्रमोशन मिळाले की अवघ्या सात दिवसांच्या आत त्या गावांत हजर व्हायचे बंधन असते, येथील पंचायत समितीत मात्र त्याला तिलांजली मिळत असून, मनमानी कारभारामुळे वरिष्ठांचेही आदेश बासनात बांधले जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
----
माढा तालुक्यात कोविडचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे त्या ग्रामसेवकांना अजून दुसरी गावे दिलेली नाहीत. त्यांच्या आहे त्या गावात ते काम करीत आहेत. लवकरच त्यांना ग्रामविकास अधिकारी सजा असणारी गावे देण्यात येतील.
- डॉ. संताजी पाटील, गटविकास अधिकारी, माढा
----
..................