बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : विद्यापीठाकडून जाहीर झालेला परीक्षा वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे असून वेळापत्रकात बदल करा, या मागणीसाठभ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. साडे अकरा वाजता आंदोलन सुरु होवून सायंकाळी पाच पर्यंत चालले. आंदोलनाचा वाढता जाेर पाहून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मागणीनूसार वेळापत्रकात बदल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन थांबले.
आंदोलनात दाेनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन झाले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचा वाढता जोर पाहून आंदोलन ठिकाणी पोलिस दाखल झाले. दुपारी साडे तीन दरम्यान विद्यापीठाने आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलाविले. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेवून वेळापत्रकात बदल करण्याचे मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री रोहित राऊत, महानगर मंत्री आदित्य मुस्के, संयोजक सचिन पारवे, पंढरपूर जिल्हा संयोजक पार्थ केरकर यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.