उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार दत्तात्रय तोंडले, पोलीस कॉन्स्टेबल मुजावर, पोलीस कॉन्सटेबल नदाफ हे सांगोला शहरात पेट्रोलिंग करत, एखतपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मस्के कॉलनीत आले असता, लॉकडाऊनमध्येही अक्षय किराणा दुकान सुरू असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्या दुकानांची तपासणी केली असता, दुकानात प्रतिबंधक अन्नपदार्थांची विक्री सुरू असल्याचे दिसून आले, तर दुकानाशेजारी असलेल्या घरासमोर बिगर नंबरच्या कारमध्ये प्रतिबंधित पदार्थाचा साठा विक्रीच्या उद्देशाने साठविल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर कारमधून आरएमडी पान मसाला, एम. सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, व्ही. सुगंधी तंबाखू, सुपरजेम पान मसाला, एस. सुगंधी तंबाखू असा १ लाख ७५ हजार ९७० रुपयांच्या गुटख्यासह १ लाखाची कार असा २ लाख ७५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी अक्षय अनिल मस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.