माढा : उंदरगाव येथे सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष सिद्धाराम काळे यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ४ लाख ७३ रुपयांचा ऐवज पळविल्याचा प्रकार घडला. विशेषत: मुलाच्या साखरपुड्याची तयारी करून थकून हे कुटुंब झोपी गेले असता पहाटे चोरट्यांनी बेडरूमचे ग्रील वाकवून कपाटातील ऐवज पळविला.
बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत सुभाष काळे यांनी माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाेलीस सूत्रांकडील माहितीनुसार, सुभाष काळे यांचा मुलगा सचिन काळे यांचा बुधवारी दुपारी साखरपुडा नियोजित करण्यात आला. त्याची दोन दिवसांपासून तयारी सुरू होती. मंगळवारी दिवसभर खरेदी आणि रात्री तयारी करून हे कुटुंब रात्री झोपी गेले. घरातील लोक बेडरूम बंद करून बाहेर हॉलमध्ये झोपी गेले होते. मध्यरात्री चोरटे परिसरात आले. पाठीमागील खोलीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाट उघडून दागिने आणि रोख ३५ हजार रुपये पळविले.
चोरट्यांनी दोन गंठण, तीन अंगठ्या, कर्णफुले आणि रोख ३५ हजार रुपये पळविले. या घटनेने उंदरगावात खळबळ उडाली. सुभाष काळे यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या चोरीची फिर्याद दिली आणि काळे कुटुंबाने चोरीचे दु:ख पचवत दुपारी मुलाचा साखरपुडा उरकला.
---
श्वान पथकाला पाचारण
चोरीची घटना समजताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अभिजीत धराशिवकर आणि पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी धाव घेतली. त्यांनी तत्काळ श्वान पथकाला आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. हे श्वान काही वेळेत घटनास्थळी दाखल झाले. मात्र, काही अंतरावरच घुटमळत राहिले.
----
फोटो : ०७ माढा रॉबरी
उंदरगाव येथे चोरट्यांनी सुभाष काळे यांचे घर फोडून पावणे पाच लाखांचे दागिने पळविले.