सोलापूर : समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या पाच लाख १४ हजार ९८० विद्यार्थ्यांना २० लाख ७० हजार ८९८ पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. विद्यार्थ्यांना १२ जूनच्या आधी पुस्तके मिळण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.
इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थी क्रमिक पुस्तकांपासून वंचित राहू नयेत, शाळेतील सर्व मुलांची १०० टक्के उपस्थिती टिकवणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानास पात्र झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि त्यांच्या अनुदानित तुकड्यांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताना १३ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. पालकांनी पाठ्यपुस्तकांची खरेदी करू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी केले आहे.
-----------
जिल्ह्यासाठी वितरणाला सुरूवात
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यामार्फत जिल्ह्याची तालुकानिहाय क्रमिक पाठ्यपुस्तकांची माध्यमनिहाय मागणी बालभारती, पुणे यांच्याकडे ऑनलाईन केलेली होती. त्यानुसार संचालक, बालभारती, पाठ्यपुस्तक भांडार व्यवस्थापक यांच्यामार्फत सोलापूर जिल्ह्याकरिता बुधवार, ४ मे पासून पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. सर्व तालुक्यांना ३१ मेपर्यंत पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत.
--------
तालुक्यांना मिळणारी पुस्तके
अक्कलकोट २ लाख ४४ हजार ५५, बार्शी १ लाख ८४ हजार ७५, करमाळा ७३ हजार ८४२, माढा १ लाख ९२ हजार ४८३, माळशिरस २ लाख ८५ हजार १०८, मंगळवेढा १ लाख ४३ हजार ८०४, मोहोळ १ लाख ८० हजार ५२, उत्तर सोलापूर २ लाख १७ हजार ५९९, पंढरपूर २ लाख ८० हजार ४६४, सांगोला २ लाख २३३, दक्षिण सोलापूर १ लाख ८४ हजार ३७३ अशा एकूण २० लाख ७० हजार ८९८ पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
--------