सोलापूर/ मुंबई : येत्या २४ डिसेंबरचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर येथील विराट जाहीर सभेला शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. या सभेला शिवसैनिक, युवासेना व महिला आघाडी मोठ्या संख्येने येत्या २२ ते २३ तारखेपासून येथे येण्यास सुरुवात होणार असून, या सभेसाठी शिवसेनेने ५ लाखांचे टार्गेट ठेवले आहे.
देशात आणि महाराष्ट्रात रामराज्य व शिवशाही आणण्याचा संकल्प शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडला आहे. हा संकल्प सिद्धीस जावा, यासाठी पक्षप्रमुख श्री विठुमाऊलींचे आशीर्वाद आणि त्यांच्या भक्तांच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये येत आहेत. येत्या २४ डिसेंबरची सभा ‘न भूतो न भविष्यती’ असेल अशी माहिती शिवसेना खासदार व सचिव विनायक राऊत यांनी आज सकाळी लोकमतशी बोलताना दिली. सध्या विनायक राऊत हे या सभेच्या तयारीसाठी येत्या २४ डिसेंबरपर्यंत पंढरपूर येथेच राहणार आहेत.
संसदेतील शिवसेनेचे गटनेते संजय राऊत, खासदार विनायक राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे व संपर्क प्रमुख तानाजी शिंदे यांच्यावर या सभेची प्रमुख जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी सोपवली आहे.
या सभेसाठी पंढरपूरला आषाढी व कार्तिकी एकदशीचे स्वरूप येणार असून मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग येथून हजारो खासगी बस, खासगी वाहने यामधून सुमारे ५ लाख शिवसैनिक पंढरपुरात डेरदाखल होणार आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गेल्या २५ नोव्हेंबरच्या अयोध्या येथील महाआरतीत युवासेना व महिला आघाडी सहभागी झाली नव्हती. मात्र पंढरपूर येथे युवासेना व महिला आघाडी देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली.
राममंदिराच्या मुद्यावर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येनंतर आता उद्धव ठाकरे हे पंढरपूरला येणार आहेत. अयोध्येत राममंदिर उभारण्याबाबत हिंदूंच्या भावनांशी सुरू असलेला खेळ आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात विराट जाहीर सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र येथे उद्धव ठाकरे यांच्या नियोजित चंद्रभागा बसस्थानक मैदान आणि इस्कॉन मंदिरानजीक असलेल्या घाटावर होणाºया महाआरतीचा कार्यक्रम येत्या एक ते दोन दिवसात निश्चित होणार असल्याची माहिती त्यांनी शेवटी दिली.