सोलापूर : माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे ग्रामपंचायतीच्या पावणे पाच लाख रूपयाचा विकास निधी अपहार केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक अन् लिपिकावर कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी तिघांविरूद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन सरपंच दादा महादेव रणदिवे (वय ३४ रा. फोंडशिरस, ता. माळशिरस), तत्कालीन ग्रामसेवक अशोक मुकूंद धार्इंजे (वय ५६ रा. जाधववाडी, बांभुर्डे ता. माळशिरस), ग्रामपंचायत लिपिक विजय खाशाबा बोडरे (वय ३९ रा. फोंडशिरस ता. माळशिरस) असे कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सरपंच व ग्रामसेवक हे २0१५ मध्ये कार्यरत होते. ४ एप्रिल २0१५ ते १0 डिसेंबर २0१५ दरम्यान फोंडशिरस ग्रामपंचायतीला १३ व्या वित्त आयोगातील ग्रामनिधीची चार लाख ७३ हजार ४९६ व पाणीपुरवठा खात्यातुन ११ हजार १00 रूपये असा एकूण चार लाख ८४ हजार ५९६ रूपये ग्रामसेवक अशोक धार्इंजे व सरपंच दादा रणदिवे यांनी स्वत:च्या अधिकारात काढुन घेतला. काढलेल्या रक्कमेतुन आवश्यक त्या वस्तु खरेदी न करता कामाच्या बनावट पावत्या तयार केल्या.
बनावट पावत्या खºया असल्याचे दाखवून पावतीवरून व्हाऊचर बिल तयार केले. खोट्या नोंदी ग्रामपंचायतच्या कॅशबुक रजिस्टरमध्ये घेतल्या होत्या. हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात आला, त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे यांनी या प्रकरणी चौकशी केली. पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी तपास केला. चौकशीमध्ये अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ चे कलम १३(१) (क), १३(२) तसेच भांदवि कलम ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४७७ (अ), ३४ प्रमाणे तिघांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.