सोलापूर : सात रस्ता परिसरात पाच महिन्यांपूर्वी विजेचा धक्का बसून पंख जळून जखमी झालेल्या घारीला वाचवण्यात वन्यजीव प्राणी मित्रांना यश आले आहे़ उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे आणि प्राणी मित्रांच्या साक्षीने पाच महिन्यांच्या उपचारानंतर तिने आज निसर्गभरारी घेतली.
नोव्हेंबर महिन्यात वन्यजीव प्रेमी प्रवीण जेऊरे यांना पंख जळालेल्या अवस्थेत एक घार सात रस्ता परिसरात आढळून आली. पुढील उपचारासाठी तिला महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पंख जळाल्याने साहाय्यक पशुअधिकारी भरत शिंदे यांनी त्यास नवीन पंख येण्यासाठी जागा करून दिली. प्रदीर्घ उपचार व योग्य संगोपन झाले. घारीला नियमित खाद्य पुरविले गेले. पाहता-पाहता घारीचे पंख पुन्हा पूर्ववत झाले. ती पिंजºयात सर्वत्र उडू लागली. आज घारीला पुन्हा निसर्गात सोडण्याची वेळ झाली. पाच महिन्यांनंतर घारीने निसर्गात झेप घेऊन सर्वांच्या चेहºयावर हास्याची लकेर उमटवली.
या घारीला निसर्गात मुक्त करत असताना प्राणी संग्रहालय संचालक डॉ. नितीन गोटे, पशुअधिकारी शुभांगी ताजणे, साहाय्यक पशुअधिकारी भरत शिंदे, काळजी वाहक अजय मस्के, किरण गायकवाड, वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे, मल्लिकार्जुन धुळखेडे, मधुकर राठोड उपस्थित होते.