सोलापूर : अवयवदानाच्या बाबतीत सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसह जनतेमध्ये झालेल्या जाणीवजागृतीतून गुरुवारी सोलापुरातील शासकीय रुण्णालय तथा सिव्हिलमध्ये नातलगांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेंदूमृत रुग्ण कृष्णहरी सत्सय्या बोम्मा (वय ४६) यांच्या पाच अवयवांचे दान करण्यात आले. यातील लिव्हर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकला ग्रीन कॉरिडॉरद्वारे पाठवण्यात आले. अन्य अवयवांमध्ये दोन डोळे शासकीय रुग्णालय तथा सिव्हिलमध्ये तर दोनपैकी एक किडणी अश्विनी सहकारी रुग्णालय तर दुसरी किडणी कुंभारी येथील अश्विनी रुरल रुग्णालयातील गरजू रुग्णास देण्यात आली.
मेंदूमृत रुग्ण कृष्णहरी बोम्मा (वय ४६, रा. जुने वालचंद कॉलेज, ३४ अ, ४४ न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांना मंगळवारी ५ जून रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास पायी चालत जाताना आकाशवाणी रोडवर रिक्षाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले होते. शल्यचिकित्सा विभागातील डॉ. ऋत्विक जयकर यांनी विशेष तत्परता दाखवून त्यांच्या युनिटमधील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. यादरम्यान डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता.
यासंबंधी तपासणी करताना मेंदूमृत होत असल्याची चिन्हे दिसून आली. सहा तासांच्या फरकाने तिन्ही चाचण्यांमध्ये हीच अवस्था दिसून आली. शेवटची चाचणी बुधवारी घेतल्यानंतर नातवाईकांना कळवण्यात आले. रुग्णास मेंदूमृत जाहीर करण्यात आले. कृष्णहरी यांच्या दोन्ही मुलांनी दु:खावेग बाजूला ठेवून अवयवदानाचा निर्णय घेतला. पुण्याच्या समितीला कळवून पुढील सोपस्कार पूर्ण झाले. सर्वप्रथम ग्रीन कॉरिडॉरद्वारे लिव्हर पुण्याच्या रुबी हॉलला पाठवण्यात आले. त्यानंतर १५ मिनिटांच्या फरकाने अश्विनी सहकारी आणि अश्विनी रुरल कुंभारी येथील रुग्णालयास किडणी पाठवण्यात आली.
शासकीय रुग्णालयातील ही दुसरी अवयवदान मोहीम ठरली. यापूर्वी १४ सप्टेंबर २०१७ रोजी बसवकल्याणच्या ओंकार महिंद्रकर याच्या रूपाने अवयवदान मोहीम पार पडली होती. शहरातील अश्विनी रुग्णालय आणि यशोधरा हॉस्पिटल अशा तिन्ही ठिकाणांहून आतापर्यंत आजच्या मोहिमेसह ९ वी ग्रीन कॉरिडॉर मोहीम पार पडली.
अवयवाच्या रूपाने पित्याची स्मृती जागवू- एक दुर्दैवी आघात आम्हा कुटुंबीयांवर झाला आहे. सहा वर्षांपूर्वी आईचे छत्र हरपले. वडीलच दोन्ही भूमिका निभवायचे. पण आता त्यांचेही छत्र हरपले. दुर्दैवाने वडील हयात नसलेतरी त्यांच्या अवयव प्रत्यारोपणाच्या रूपाने कोणाचेतरी जीव वाचतील या भावनेतून आम्ही हा निर्णय घेतल्याच्या भावना बी-फार्मसी झालेल्या राहुल आणि अक्षय (छोटा) यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.
या वैद्यकीय पथकाचे सहकार्य- ग्रीन कॉरिडॉर मोहीम करण्याचे ठरल्यानंतर ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीन मेश्राम, सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. अनघा वरुडकर, डॉ. ऋत्विक जयकर, डॉ. सचिन जाधव, डॉ. संतोष देशमुख, डॉ. प्रदीप कसबे, अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संदीप होळकर, नेत्रविभागप्रमुख डॉ. सुहास सरवदे, रुबी हॉलचे डॉ. संतोष, भूलतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. मनोहर त्यागी, डॉ. तोसिफ अत्तार, डॉ. श्रीगणेशा कामत, डॉ. संतोष भोई, डॉ. राजेश चौगुले, डॉ. रोहिणी पडसलगीकर, परिचारिका क्षीरसागर, मेट्रन सोमवंशी, चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचारी या सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
त्या दोन सुपुत्रांची सामाजिक बांधिलकी- वडिलांचा अपघात होऊन ते वाचू शकत नाहीत, हे लक्षात येताच मेंदूमृत रुग्ण कृष्णहरी यांचा मोठा मुलगा राहुल आणि छोटा अक्षय यांनी दु:खावेग बाजूला सारला. आपल्या वडिलांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. दोन्ही मुलांनी बी-फार्मसी आणि डी-फार्मसी या वैद्यकीय क्षेत्राशी निगडित शिक्षण घेतल्याने अवयवदानाचे महत्त्व लक्षात घेऊन कोणाच्याही समुपदेशाविना हा अवयवदानाचा निर्णय घेतला. बुजुर्ग मंडळींचा विरोध पत्करूनही त्यांनी उचललेले पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे.
रुग्णालयात येणारा कोणताही रुग्ण सर्वप्रथम वाचला पाहिजे, ही भावना प्रत्येक डॉक्टराची असते, त्या भावनेतूनच मेंदूमृत रुग्ण कृष्णहरी यांच्या बाबतीतही आमच्या डॉक्टरांनी प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न विफल ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णाच्या नातलगांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वी झाली. - डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय.