सोलापूर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला गुरुवारी सकाळी दणका दिला आहे. यापूर्वी बदली झालेल्या पाच कर्मचार्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला आहे.
प्राथमिक शिक्षण विभागातील जगताप, कोमारी, समदुरले ,मस्के ,श्रीमती शेख या पाच जणांना शिक्षण विभागाने गुरुवारी सकाळी कार्यमुक्त केले आहे या सर्वांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गेल्या महिन्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बदलण्यात यावे असे परिपत्रक जारी केले होते.
आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांची यादी प्रशासन विभागाला दिली, पण इतर विभागांनी मात्र अंमलबजावणी केली नव्हती. प्राथमिक शिक्षण विभाग रडारवर होता. या विभागातील बरेच कर्मचारी वादग्रस्त ठरल्याने अनेक दिवसापासून काम करणाऱ्यांना बदलण्यात यावे, अशी मागणी वाढली होती.
या मागणीची दखल घेत सीईओ स्वामी यांनी बदली झालेल्या पाच जणांना तात्काळ कार्यमुक्त करावे अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाला पहिला दणका बसला आहे. कार्यमुक्त झालेले शिक्षण विभागातील हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले आहेत.