अचानक लागलेल्या आगीत बॉम्बे इलेक्ट्रॉनिक्स, सिद्ध नागेश किराणा व जनरल स्टोअर्स, नरगिडे लॅबोरेटरीज, विशाल ऑटोमोबाईल्स, बालाजी गॅस शेगडी रिपेअरिंग अशी पाच दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत. यामध्ये सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पहाटे अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करताच दुकानाच्या परिसरातच पाठीमागे राहणाऱ्या शेख परिवाराने तातडीने जागे होऊन प्रारंभी घराच्या परिसरातील बोअरच्या माध्यमातून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, लोकनेते साखर कारखाना व लोकमंगल साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या व आग आटोक्यात आणली. वेळीच अग्निशामक दलाच्या गाड्या आल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत समजू शकले नाही.
दरम्यान याबाबत माजी सरपंच बिलाल शेख यांनी अज्ञात कारणाने आग लागून पाच दुकाने जळाल्याची खबर मोहोळ पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान, या ठिकाणी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, माजी उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके, महेश आंडगे, अण्णा फरतडे, संतोष सुरवसे, माजी सरपंच बिलाल शेख, आदींनी भेट दिली.
नगरपरिषद होऊन अग्निशमन गाडी नाही
मोहोळ शहराला आता नगर परिषदेचा दर्जा मिळाला आहे. पाच वर्षे उलटून गेली; परंतु अद्याप नगर परिषदेला अग्निशामक दलाची गाडी नाही. त्यामुळे लोकनेते अनगर, चिंचोली काटी औद्योगिक वसाहत, भीमा कारखाना, लोकमंगल कारखाना या ठिकाणांहून अग्निशमन दलाला यावे लागते. त्यामुळे वेळ जातो. याबाबत नगरपरिषदेने तातडीने अग्निशामक दलाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सामाजिक संस्थांची मदत
मोहोळ शहरामध्ये ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे संकट येते. त्यावेळेस शासकीय मदत मिळत नाही, हे लक्षात घेऊन शहरातील सामाजिक संघटना व अन्य लोकांच्या माध्यमातून अशा आपदग्रस्त व्यावसायिकांना मदत करण्यात येते. ११ एप्रिल रोजी अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झालेल्या या पाच व्यावसायिकांना भाजपचे नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी २५ हजार रुपयांची मदत केली. तसेच उद्योजक इलियास शेख, हेमंत गरड यांनी मदत केली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मदत देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष प्रवीण डोके यांनी सांगितले.
फोटो
११मोहोळ-आग
ओळी
मोहोळ शहरातील कुरुल रोड हायवेवर पाच दुकानास आग लागून नुकसान झाले.