तालुक्यातील पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांंकडील कोंबड्यांचे सर्वेक्षण चालू आहे. अद्याप कोठेही कोंबड्यांमध्ये अशा आजाराविषयी लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र, अचानक कोंबड्या मृत पावल्यास पशुपालकांनी त्याची परस्पर विल्हेवाट न लावता तालुका पशुचिकित्सालय अगर आपल्या कार्यक्षेत्रातील पशुधन विकास अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विस्तार अधिकारी डॉ. असलम सय्यद यांनी केले आहे.
कोरोना महाभयंकर साथीच्या आजारानंतर आता पशु-पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पशुपालक शेतकरी, पोल्ट्रीमालक चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बर्ड फ्लू साथीची गंभीर दखल घेत जंगलगी (ता. मंगळवेढा) येथील ‘त्या’ पोल्ट्रीतील कोंबड्यांसह परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुका पशुचिकित्सालय विभाग अलर्ट झाला आहे.
बर्ड फ्लूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पशुचिकित्सालयामार्फत पाच पथके तयार ठेवली आहेत. सांगोला तालुक्यात गायगव्हाण, खिलारवाडी, महूद, कटफळ, कडलास, सोनंद, पाचेगाव बु!! आदी ठिकाणी पोल्ट्री फॉर्ममध्ये मोठ्या संख्येने कोंबड्या आहेत. त्याचबरोबर शेतकरी पशुपालकांकडे घरटी २० ते २५ कोंबड्या गृहीत धरून सर्वेक्षण चालू आहे. त्यानुसार पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आपाआपल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पशुपालक व पोल्ट्रीमालकांना भेटून एकाच वेळी अनेक कोंबड्या पक्षी मृत पावल्यास त्याची परस्पर विल्हेवाट न लावता नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशा सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रातील जलाशय किंवा पाणी साठ्यामध्ये बगळे, कावळे इतर पशुपक्षी मृत पावले आहेत का? याचीही माहिती घेत आहेत. पक्ष्यांना बर्ड फ्लू झाला असेल तर अशा पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे, असे पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल धुमाळ यांनी सांगितले.
तरच पुढील कारवाई केली जाईल
सांगोला पशुचिकित्सालय विभागामार्फत आरआरटी या नावाने पाच पथके तयार ठेवली आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन पशुधन विकास अधिकारी, दोन पशुधन पर्यवेक्षक, दोन शिपाई यांचा समावेश केला आहे. एखाद्या शेतकऱ्याकडे किंवा पोल्ट्रीमध्ये अचानक कोंबड्या मृत पावण्याच्या घटना घडू लागल्या असता सदर पथके त्या ठिकाणी जाऊन मृत कोंबड्या ताब्यात घेतील. तपासणीसाठी पुणे किंवा भोपाळ (मध्य प्रदेश) येथे पाठवून बर्ड फ्लू आहे किंवा नाही याची शहानिशा करून पुढील कारवाई केली जाणार आहे.