सोलापूर :पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारी साठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. त्यांच्या सुखकर प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यंदा राज्यातील सहा प्रदेशाच्या माध्यमातून ५ हजार बसेसचे नियोजन आखले आहे. गर्दीच्या नियोजनासाठी शहराबाहेर तात्पुरत्या चार बसस्थानकाची उभारणी केली आहे. प्रवाशांना योग्य मार्गदर्शनासाठी ५५० कर्मचारी तैनात ठेवले आहेत.
वर्षातून होणाऱ्या चार वाऱ्यांपैकी आषाढी वारीला पंढरपुरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. प्रवाशांना सुसज्ज सेवा देण्यासाठी महामंडळाने नियोजन आखले असून, त्याच्या पालकत्वाबी जबाबदारी सोलापूर विभागावर सोपवण्यात आली आहे. आषाढी एकादशी २९ जून रोजी असल्याने हे नियोजन २५ जून ते ३ जुलै असे आखले आहे. गर्दीचे नियोजन व्यवस्थित होण्यासाठी पंढरपूर शहर व शहराबाहेर प्रवास मार्गानुसार तात्पुरते बसस्थानक उभारले आहे. यातील पंढरपूर शहरातील चंद्रभागा स्थानकावर १५ शेड उभारले आहेत.
येथून पुणे, सोलापूर, सातारा विभाग व मुंबई प्रदेशची वाहतूक होणार आहे. भीमा बसस्थानक तीन रस्ता मोहोळ-सोलाूपर रोडवर उभारले आहे. येथे २९ शेड सुविधा आहे. विठ्ठल सह. साखर कारखाना, टेंभुर्णी रोड स्थानकावरुन नाशिक प्रदेशच्या बसेसद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाईल. सांगोला रोडवर पांडुरंग बसस्थानक असून, येथून कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी विभागातील बसेस थांबतील. येथे ७ पत्राशेड उभारले आहेत. प्रवाशांना ज्या मार्गावर जायचे आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ५५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
बसेस दुरुस्तीसाठी यांत्रिक कार्यशाळायात्रा कालावधीत बसेस नादुरुस्त झाल्यास चारही तात्पुरत्या बसस्थानकावर ब्रेक डाऊन वाहने असतात. मेन्टेनन्स टीम तेथे तैनात केली आहे. सूचना मिळताच तातकीने कार्यवाही केली जाईल. बसेस दुरुस्तीसाठी यांत्रिक कार्यशाळा निर्माण केली आहे. २४ तास कर्मचारी तेथे असतील.आषाढी यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी पालक विभाग म्हणून आमच्यावर आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. त्यानुसार बसेसचे पार्किंग, प्रवाशी भाविकांसाठी निवारा, अन्य पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.- अजय पाटील, जिल्हा वाहतूक अधिकारी, सोलापूर विभाग