सोलापूर :महापालिकेने एका खासगी कंपनीकडून मागवलेले दहा हजार अँटिजेन टेस्ट शुक्रवारी पोहोचणार नाहीत. त्यामुळे आता औरंगाबाद मनपाकडून पाच हजार किट उसने म्हणून घेतले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत मनपाच्या औषध भांडारात पोहोचणार आहेत.
महापालिकेने दहा दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात २३ हजार अँटिजेन टेस्ट करण्यात येतील, असे जाहीर केले होते. यासाठी दहा दिवसांपूर्वी सरकारी पोर्टलवर ५० हजार किटची आॅर्डरही नोंदवली. कंपनीने आठ दिवसांत किट उपलब्ध देण्याची तयारी दाखवली. परंतु, यातही गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. देशभरात अँटिजेन टेस्ट किटचा तुटवडा आहे. सरकारी पोर्टलवरील कंपनीकडून वेळेवर किट उपलब्ध होणार नसल्याचे लक्षात येताच आयुक्त पी. शिवशंकर यांनी पिंपरी-चिंचवड मनपाकडून पाच हजार किट उसने म्हणून घेतले. यातील दोन हजार किट सध्या शिल्लक आहेत.
दरम्यान, खासगी कंपनीने दहा हजार किट शुक्रवारी पाठवून देतो, असे कळवले. बुधवारी विमान उड्डाणाचे कारण देऊन शुक्रवारी किट उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे औरंगाबाद मनपाकडून पाच हजार किट घेण्याचे ठरले. आरोग्य विभागातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी औरंगाबाद येथून पाच हजार अँटिजेन टेस्ट किट सोलापूर मनपासाठी रवाना करण्यात आली आहेत.
शहरातील वृद्ध व्यक्तींवर तत्काळ औषधोपचार व्हावेत, यासाठी या टेस्ट केल्या जात आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास ४५०० टेस्ट झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.