सोलापूर - वाळू वाहतूक करताना जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी २० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रूपये लाच स्वीकारण्याची संमती दर्शविली. दरम्यान, त्यापैकी ५ हजार रूपये लाच रक्कम स्वीकारताना महसूल सहाय्यकास रंगेहाथ पकडले. या प्रकरणात नायब तहसिलदाराचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरच्या पथकाने यशस्वी केली.
याप्रकरणी प्रकाश विश्वनाथ सगर (वय ५५, नायब तहसिलदार), विवेक विठ्ठल ढेरे (वय ३२, महसूल सहाय्यक) याच्याविरोधात मंगळवेढा पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदार याचे वाहन वाळू वाहतूक करताना तहसिल कार्यालय, सांगोला यांनी पकडले होते. त्यानंतर वाहनावर केलेला दंड तक्रारदार याने भरला. याचवेळी वाहन ताब्यात घेण्यासाठी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे वाहन सोडण्याबाबत अर्ज केला.
अर्जावरून तक्रारदार यांचे वाहन सोडण्याची परवानगी देण्याकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथील नायब तहसिलदार व महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वत:करिता तसेच उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा यांच्याकरिता २० हजार रूपये लाचेची मागणी करून १० हजार रूपये घेण्याची संमत्ती दर्शविली त्यानंतरही पाच हजार रूपये लाच रक्कम स्वीकारताना विवेक ढेरे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस अंमलदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, राहुल गायकवाड यांनी यशस्वी पार पाडली.