यावेळी धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे इतर नेते महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने टीकेची झोड उडवत आहेत. मीही विरोधी पक्षनेता होतो. मात्र आम्ही टीका करताना जनतेच्या मनातील प्रश्न मांडायचो. त्यामुळे त्या टीकाही जनतेला आपल्या वाटायच्या. मात्र आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी स्वत:च्या मनातील टीका करून ती लोकांच्या माथी मारण्याचे पाप करत आहेत. मात्र जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, तोपर्यंत त्यांचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे सांगितले.
दिल्लीत केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या शेतकरी विधेयकाच्या विरोधात गेल्या पाच महिन्यांपासून लाखो शेतकरी उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्याकडे साधी चर्चेसाठी जाण्याची वेळ पंतप्रधानांकडे नाही. मात्र तेच पंतप्रधान पाच राज्यांतील निवडणुकांसाठी लाखोंच्या सभा घेत आहेत. तर भाजपचे राज्यातील नेतेमंडळी राज्यातील सरकार शेतकरीविरोधी असल्याचा अपप्रचार करीत आहेत. मग केंद्र सरकारच्या भूमिकेकडे ते कोणत्या नजरेने पाहतात ते आधी स्पष्ट करावे, अशी टीका भाजप नेत्यांवर धनंजय मुंडे यांनी केली.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर १०५ आमदार घेऊन त्यांना विरोधी पक्षात बसण्याची वेळ खा. शरद पवार यांनी आणली. तर ६४ आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री करून दाखविला. होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून दाखविण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचा नाद देवेंद्र फडणवीसांनी करू नये, असा टोला त्यांनी लगावला.
रणजितसिंह मोहिते-पाटील राजकीय पॉझिटिव्ह
राज्याच्या पोटनिवडणुकांचा इतिहास पाहता बिनविरोध करण्याचा बहुतांश कल असल्याचा इतिहास आहे. सध्याच्या पोटनिवडणुकीमध्येही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रस्ताव आ. प्रशांत परिचारकांचा होता. मात्र अकलूजची मोहिते-पाटील मंडळी यामध्ये उतरली. त्यांनी पॅकेज घेऊन इच्छा नसतानाही समाधान आवताडेंमध्ये हवा भरून त्यांना निवडणुकीत उतरविले व तेच नेते आता पॉझिटिव्ह झाल्याचे नाटक करून प्रचारातून अलिप्त झाले आहेत. मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह नसून राजकीय पॉझिटिव्ह असल्याची टीका आ. संजय शिंदे यांनी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर केली. १५ तारखेनंतर आणखी अशाच काही गमतीशीर घडामोडी पाहावयास मिळणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.