सोलापूर : वर्षातील चार वाऱ्यांमध्ये वारकरी पंढरपुरात प्लॉट घेऊन नामसंकीर्तन करतात. प्लॉटसाठी दरवेळी अर्ज करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी ६५ एकर परिसरातील प्लॉट प्रत्येक दिंडीसाठी कायमचा निश्चित करावा, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कार्तिकीच्या महापूजेसाठी फडणवीस पंढरपुरात आले होते. तेव्हा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी त्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणी केली.
पूर्वी नदी वाळवंटामध्ये हे सर्व कार्यक्रम केले जात होते व ते सर्व जण तेथेच रहात होते. परंतु स्वच्छतेचे कारण समोर करून सर्वांना ६५ एकर मधील प्लॉटमध्ये राहणेसाठी ती जागा खुली केली आहे, असे सांगण्यात आले आहे. पण ६५ एकर मधील प्लॉट घेण्यासाठी वारकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला तीन महिन्यातून एकदा प्लॉट घेणेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला त्या जागेवर दिंडी वेगवेगळी असते. सध्या प्रत्येक वारीला प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे कठीण होते आहे .
एका दिंडीला फक्त तीन दिवस तो प्लॉट अपेक्षित आहे. त्यामुळे ६५ एकरमधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला कायमस्वरुपी निश्चित करण्यात येऊन अर्ज एकदाच घेऊन त्यांची नोंद कायम स्वरुपी करण्यात यावी, अशी मागणी आहे. दरम्यान या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे इंगळे महाराज यांनी सांगितले.