दक्षिण
सोलापूर : भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विठ्ठल
पाटील- वसंत पाटील गटाने विरोधी बबलेश्वर गटावर कुरघोडी करत दोन सदस्य
फोडले. त्यामुळे या गटाचे चिदानंद कोटगोंडे आणि सविता तुरबे यांची
अनुक्रमे सरपंच आणि उपसरपंच म्हणून निवड झाली.
निवडणुकीत विठ्ठल पाटील गटाला नऊ तर विरोधी गटाचे भीमाशंकर बबलेश्वर-
कमळे गटाला आठ जागा मिळाल्या होत्या. सरपंच पदासाठी दोन्ही गटात चुरस होती.
अखेर विठ्ठल पाटील गटाने विरोधी गटाचे दोन सदस्य गळाला लावले. सरपंच
पदाच्या निवडणुकीत पाटील गटाचे चिदानंद कोटगोंडे यांना ११ तर विरोधी
गटाच्या युक्ता यतीन शहा यांना ६ मते पडली. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत
सविता तुरबे (११ मते) यांनी विरोधी गटाच्या सोमनींग कमळे (६ मते) यांच्यावर
विजय मिळवला. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
भीमा-सीना नद्यांच्या परिसरातील भंडारकवठे गाव राजकीय
दृष्ट्या मोक्याचे मानले जाते. या ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी
तालुक्यातील नेत्यांनी पडद्यामागून सूत्र हलवली. निवडणुकीनंतर घडामोडींना
वेग आला. पूर्वाश्रमीच्या काँग्रेस आणि आता शिवसेनेत असलेल्या नेत्याने ही
ग्रामपंचायत आपल्या गटाकडे खेचून घेण्यात यश मिळवले आहे.
----
फोटो : २३ चिदानंद कोटगोंडे