मृग नक्षत्र कोरडे गेल्याने सुरुवातीलाच खरिपाच्या पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद, तूर, मूग, बाजरी, सूर्यफुल पेरणी केली. खरिपाच्या १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. पिकेही बहरली. त्यानंतर पाऊस गायब झाला. १५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी पिके सुकू व जळू लागली आहेत. तर काही ठिकाणी ती पिवळी पडली आहेत. उडीद पिकावर मावा रोग पडला आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही, तर जिरायत भागातील खरिपाची पिके हाताला लागण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यातच आता ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे शेतात तण वाढले आहे. तसेच पिकांवर रोगराईचा धोकाही वाढला आहे.
..........
खरीप पिकांची चांगली वाढ झालेली असताना पावसाने ओढ दिली आहे. उडीद पिकावर मावा पडल्याने पिके पिवळी पडली आहेत. पाऊस आला तर रोग धुऊन जाईल.
- देवराव चव्हाण, प्र. तालुका कृषी अधिकारी
.........
गतवर्षी उडीद पिकातून चांगले उत्पन्न मिळाले होते. यंदा पावसाने ओढ दिल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. उडीद पिवळे पडल्याने जळून चालले आहे. यंदा मोठे नुकसान होणार आहे.
- बाळासाहेब पवार, शेतकरी, हिवरवाडी.
................
फोटो : करमाळा तालुक्यातील रोसेवाडी शिवारातील उडीद पिकावर मावा रोग पडल्याने पीक पिवळे पडले आहे.
फोटो १३ करमाळा१