कुरुल : सीना नदीला पूर आल्याने मोहोळ तालुक्यात नदीकाठच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसानीपोटी पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे मोहोळ तालुकाध्यक्ष वैभव जावळे यांनी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील काही दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात पाऊस जास्त झाल्यामुळे सीना नदीला पूर आला. संकटकाळात चार महिन्यांपासून जोपासलेले पीक पुराच्या पाण्यामुळे हातचे गेले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. मोहोळ तालुक्यातील बाधित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुकाध्यक्ष वैभव जावळे यांनी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे माढा तालुका कार्याध्यक्ष संतोष कवले, आनंद बळवंतराव, भागवत जावळे, विशाल मासाळ उपस्थित होते.