आप्पासाहेब पाटील, सोलापूर : पुण्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या पावसामुळे नदी, नाले, धरणं भरली आहेत. त्यातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उजनी धरणात दौंड येथून सव्वा लाखांचा विसर्ग सुरू असून उजनी धरणही १०२ टक्के भरलं आहे. मृत साठ्यात गेलेले उजनी धरण केवळ ११ दिवसात १०० टक्के भरले आहे. तसेच वीर धरणातून भीमा नदीपात्रात पाणी येत असल्याने पंढरपुरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीपात्राशेजारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार भीमा नदीपात्रात पाणी वाढल्यानं मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील महादेव मंदिरास पाण्यानं वेढा घातला आहे. सकाळी दौंड येथून ८१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग होता, ११ वाजता विसर्गात वाढ करून १ लाख क्युसेक असा करण्यात आला. त्यानंतर दुपारी ११ वाजता पुन्हा विसर्गात वाढ करून तो १ लाख १६०० असा केला. सायंकाळी पाच वाजता पुन्हा विसर्गात वाढ करून १ लाख २५ हजार असा करण्यात आला. त्यामुळे वेगाने पाणी भीमा नदीपात्रातून पुढे येत आहे.
पंढरपुरात पुरस्थिती निर्माण होत असल्यानं नगरपरिषदेने काही रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. भीमा नदीपात्रात पाणी वाढल्यानं लोकांना नदी परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नदी किनारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन उजनी धरण प्रशासनाने केले आहे.