भीमा नदीला आक्टोबरमध्ये महापूर आल्याने नदी काठावरील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, अरळी, सिद्धापूर या बागायत क्षेत्रामध्ये पाणी घुसून पिकाची हानी झाली होती. यंदा शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात इतर पिकांचेही नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता.
पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना ४२ लाखांचे वाटप करून दिवाळी गोड केली होती. शासनाकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने शासनाने दोन टप्प्यांत निधी देण्याचे धोरण ठरविल्याने दुसऱ्या टप्प्यात मंगळवेढ्यासाठी २० कोटी ३६ लाख १८ हजार रुपये महापूर व अतिवृष्टीसाठी प्राप्त झाले आहेत. हे अनुदान सोमवारनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील, असे महसूल विभागाने सांगितले, तर अतिवृष्टीमध्ये मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात घरांची पडझड झाली होती. यासाठी ५८ लाख ३२ हजार रुपये निधी प्राप्त झाल्याचेही महसूल विभागाने सांगितले.