दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरालगत अनेक शेतकरी फुलांची शेती करतात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. गेल्यावर्षी फाल्गुन, चैत्र, वैशाख महिन्यात कोरोनाच्या काळात कडक निर्बंध घातले होते. तसेच यावर्षीही कडक निर्बंध लावल्यामुळे फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आली आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येतात. मोठ्या भक्तिभावाने फुलांचे हार घेऊन ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस अर्पण करतात. भाविकांनी हार-फुले घेतल्याने हार विक्रेत्यांबरोबर फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची गुजराण होत होती. आत्ता सव्वा वर्षात दुसऱ्यांदा पंढरपूर येथील फुलांचा लिलाव पूर्णपणे बंद झाल्यामुळे उमललेल्या कळ्या जागीच सुकून जात आहेत.
या जिल्ह्यात होते फुलांची निर्यात
पंढरपुरातून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर, सांगली, सातारा, विजापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी फुलांची निर्यात केली जाते. परंतु लिलाव बंद असल्याने व वाहतूक ठप्प असल्यामुळे फुलांची निर्यात करणे हे कठीण होऊन बसले आहे. या सर्व परिस्थितीमुळे पंढरपूर परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.
कोट ::::::::::::::::::::
चैत्र, वैशाख या महिन्यात लग्नसराई, खेड्यापाड्यातील ग्रामदैवतांच्या यात्रा, गुढीपाडव्यामुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. भावही चांगला मिळतो. यामुळे आम्ही प्रत्येकवर्षी या महिन्यात विक्रीसाठी येणाऱ्या फुलांचा बहार धरतो. दोन वर्ष झाले लॉकडाऊनमुळे आमचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
- रियाज शेख,
शेतकरी, कासेगाव
कोट ::::::::::::::::
फुल शेती करताना लागवडीपासून ते फुले लिलावाला घेऊन जाईपर्यंत साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. तो खर्चही दोन वर्ष निघाला नाही. विद्राव्य खते, औषधे, ड्रीप, पाईप लाईन, मशागत, तोडणी याचाही खर्च होतो, तोही निघाला नाही.
- वसीम शेख
फूल उत्पादक शेतकरी, कासेगाव