सोलापूर : व्रतवैकल्याचा मानला जाणारा श्रावण महिना आणि सणाच्या निमित्ताने केली जाणारी भगवंताची पूजा आणि त्यासाठी वापरण्यात येणाºया विपूल प्रमाणातील फुलांमुळे सोलापुरातील फूल बाजार कडाडला असून, पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे आवक कमी झाली आहे. त्यातच श्रावणात मागणी अधिक असल्यामुळे फुलांचे दर वाढले आहेत.
दरम्यान, सोलापूर शहरातील बाजार समिती, टिळक चौक, मधला मारूती, कन्ना चौक, जोडबसवण्णा चौक, आसरा चौक, सात रस्ता परिसर, जुळे सोलापूर, विजापूर वेस, नवीपेठ, दत्ता चौक, अशोक चौक आदी भागात फूलविक्रेते आहेत. याबाबत माहिती देताना फूलविक्रेते सूर्यकांत पाटील यांनी सांगितले की, पांढरी शेवंती, पिवळा धमक व भडक केशरी झेंडू, नाजूक जुई, जांभळ्या निळ्या रंगाचा अष्टर अशा अनेक प्रकारच्या फुलांनी श्रावणमासाची शोभा वाढविली जाते़
शंभू महादेवाचा सोमवार, मंगळागौरीचा मंगळवार, महालक्ष्मीचा शुक्रवार आणि फुलांची विशेषत: यामुळे त्या त्या दिवशी विविध रंगांच्या फुलांचा मान असतो. फुलांचा खपदेखील भक्तांच्या श्रद्धेवरच अवलंबून आहे. यामुळे श्रावणानिमित्त देवाच्या चरणापासून मुकुटापर्यत फुलांची आकर्षक रचना करुन श्रावण मासाच्या पूजेचे महत्त्व अधोरेखित भक्तांमधून होत असते असेही त्यांनी सांगितले़
फुलांतून साकारतात कलाकृती...- श्रावणाच्या निमित्ताने मंदिरामधून शिवलिंगाची पूजा तसेच घराघरातून महालक्ष्मीची पूजा केली जाते. रंगीबेरंगी फुलांची आरास करुन फुलांमधून विविध प्रतिमा साकारल्या जात आहेत. यामुळे फुलाचा आविष्कार श्रावणात व्रतवैकल्यांच्या माध्यमातून दिसून येतो. श्रावणात घरोघरी प्रथेप्रमाणे सत्यनारायण पूजा केली जाते. यामुळे या पूजेच्या निमित्ताने सत्यनारायणावर वाहण्यासाठी फुले वापरली जातात.
फुलांचा वापर करुन आकर्षक कलाकृतीदेखील साकारल्या जातात. विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छांची रचना, देवीच्या किरीटापासून ते पैंजणापर्यंतच्या दागिन्यांमधून फुलांचा आविष्कार अनुभवायला मिळतो आहे. घराच्या दारातील रांगोळीपासून देवघरातील देव्हाºयापर्यंत फुले पाहायला मिळतात. अर्थात श्रावण महिना असल्याने विविध धामिक कार्यक्रम, पूजेच्या माध्यमातून सर्वच प्रकारच्या फुलांची मागणी वाढते.
फुलांचा प्रकार प्रतिकिलो दर
- - झेंडू ६० ते ७० रूपये
- - निशिगंधा १५० रूपये
- - जाई-जुई ३०० रूपये
- - मोगरा २५० रूपये
- - गुलाब ८० रूपये
- - चिनी गुलाब १५० रूपये
- - शेवंती २२० रूपये
- - लिली ५ रूपये पेंडी
- - गुलाब लिली २० रूपये पेंडी
या ठिकाणाहून येतो माल- सोलापूर बाजार समितीत फूल बाजार आहे़ या बाजारात बंगळुरु, पिंजारवाडी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, कुर्डूवाडी, बारामती आदी शहर व गावातून माल येतो़ यंदा पाऊस उशिराने सुरू झाल्याने माल कमी अधिक प्रमाणात येत आहे़ काही शेतकºयांकडे कमी उत्पादन असल्याने ते शेतकरी आपल्या दुचाकीवर फुले बाजारात विक्रीसाठी आणतात़
काही शेतकरी थेट विक्री करीत असल्याने फूल बाजारात माल कमी येत आहे़ दररोज साधारण: २० ते २२ गाड्या माल येतो़ श्रावणात प्रामुख्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर वाढतो. मात्र यावर्षी ऐन श्रावणात फुलांचे दर वाढले आहेत़ - मोसीन बागवान,अध्यक्ष - फूल बाजार संघटना