कामती : ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ बालकवींनी या कवितेत निसर्गाचे केलेले वर्णन कामती परिसरातील माळरानावर अनुभवायला मिळत आहे. या माळरानावर रानफुले बहरली असून, हिरवेगार गालिचे गवत पांघरून वसुंधरा नववधूप्रमाणे सजली आहे.
तरवड, महानंदी, उन्हाळी, कागदी फुले, गुलमोहर, गोकर्ण व यलतर अशी विविध रानफुले या माळरानावर बहरली आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या गवतांनी परिसर हिरवागार झाल्याचे पाहवयास मिळत आहे. या रानफुलांवर फुलपाखरे लपंडाव खेळत आहेत. कामती परिसरात रानवेली व गवताला पूरक पाऊस झाल्यामुळे कोकणचा परिसर असल्याचा अनुभव मिळत आहे. कोरोनामुळे बाहेरची सफर न करता आल्याने बाहेर फिरणाºया हौशी लोकांना ही एक सौंदर्याची पर्वणी पाहवयास मिळत आहे.
कामती बु. येथील तलावाचा परिसर, दादपूर, कोथाळे, सोहाळे, वाघोली या भागातील वनविभागाचा परिसर, बेगमपूर येथील बेगमबी दर्गा अशा विविध ठिकाणचा परिसर नयनरम्य झाला आहे. या परिसरात रंगीबेरंगी फुलपाखरेही फुलांमधील मध टिपताना दिसतात. चालू वर्षी परगावाहून येणारे गुरेराखी लोकं कमी प्रमाणात आल्याने माळरानावर गवत जास्त प्रमाणात दिसत आहे. पाऊस असाच पडत राहिला तर सौंदर्यात आणखीन भर पडणार आहे.
निसर्गात आमूलाग्र बदलकोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण जग ठप्प झाल्यामुळे निसर्गात आमूलग्र बदल झाल्याचे पहावयास मिळत आहे. निसर्गाने जरी त्याचे रौद्ररूप दाखविले असले तरी सौंदर्य देखील आपणास पहावयास मिळत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील निसर्गाची सफर केल्यास उत्तम अनुभव मिळणार आहे. या परिसरातील निसर्गाच्या सान्निध्यात आल्यास आपणांस नवनवीन झाडे, फुले, वेली, गवत व फुलपाखरे दिसणार आहेत.