सोलापूर : कोरोना या संसर्गजन्य रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून अनेकांच्या घरातील किचन बदलले असून त्यामध्ये हेल्दी पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. आहारामध्ये भाजीपाला वाढला असून विविध यूट्युबवरील रेसिपी पाहून स्वयंपाक बनवण्याची पद्धत बदलली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. तब्बल दोन-तीन महिने राहिलेल्या संचारबंदीमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी विविध पदार्थ खाण्यावर भर दिला होता. नेहमीप्रमाणे करण्यात येणारे पदार्थ आणि घरात राहिल्यामुळे हेल्दी, पण चवीला वेगळे पदार्थ खाण्यावर लोकांनी भर दिला होता. या सवयी पुढे कायम राहिल्या आणि त्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्यास आपल्या शरीरामध्ये ताकद असावी यासाठी भाजीपाला, कडधान्य, मांस, अंडी असे पदार्थ तयार केले जात आहेत.
कच्च्या भाज्या कडधान्य
- 0 पडवळ, दुधी भोपळा, वांगे, भेंडी, दोडका अशा फळभाज्या; बटाटा, सूरण, गाजर, मुळा इ., कंदभाज्या; पालक, मेथी, शेपू, माठ, राजगिरा अशा पालेभाज्या; केळफूल, हादगा इ. फूलभाज्या वाढल्या आहेत.
- 0 मूग, मटकी, वाटाणा, चवळी अशी कडधान्ये आहेत. वापर आमटी, वरण किंवा उसळ म्हणून जवळपास दररोजच होतो. मात्र आवर्जून हे पदार्थ करण्यासाठी दिवस ठरवले जात आहेत.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच
- 0 शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ, चिकन, मासे, अंडी व सोया आवश्यक आहे. अशा पदार्थांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात.
- 0 डाळी व कडधान्ये हेदेखील या दृष्टीने महत्त्वाचे असून ते भारतीय आहारांमधील प्रथिनसंपन्न मूलभूत स्रोत आहेत. दूध, दही व ताक यांचा समावेश आहारामध्ये असायला हवा.
फास्ट फूडवर अघोषित बंदी
0 कोरोना हा संसर्गजन्य रोग येण्यापूर्वी लोक आठवड्यातून एकदा बाहेर जाऊन पिझ्झा, बर्गर, चायनीज पदार्थ असे फास्ट फूड आवडीने खाल्ले जात होते. मात्र कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये फास्ट फूड खाणे बंद झाले आहे. फास्ट फूडवर अघोषित बंदी घालण्यात आली आहे.
गृहिणी म्हणतात
कोरोनापूर्वी नेहमीप्रमाणे घरातील मेनू ठरलेले असायचे. मात्र आता घरामध्ये जेवण करत असताना शरीराला पौष्टिक कोणत्या भाज्या आहेत, याचा विचार करून स्वयंपाक करत असतो.
- सारिका सरवदे, बुधवार पेठ
कोरोनाने खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी काय खावे आणि काय नाही याबाबत बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आहारात खूप फरक पडला आहे.
- कमल पेंढे, भवानी पेठ
किचनमध्ये पूर्वीदेखील स्वयंपाक होत होता, आताही होतोय, मात्र आताच्या जेवणात फरक पडला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावे आणि काय नाही याबाबत बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या.
- मोहिनी शिरसागर, हनुमान नगर