कुरुल : ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष, संघटनांचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. विनाकारण गोंधळ घातला तर गुन्हे दाखल होतील. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांच्या आयुष्याला राजकारणामुळे वेगळे वळण लागू नये. प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर जपून करा, ही निवडणूक शांततेत पार पाडा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी केले.
कुरुल ही मोहाेळ तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथे १७ जागांसाठी चुरशीची दुरंगी लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी कुरुल येथे विठ्ठल मंदिरात दोन्ही पॅनेलचे उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांची व शांतता कमिटीची शुक्रवारी रात्री बैठक घेतली. यावेळी शिंदे यांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले.
प्रचारात व सोशल मीडियावर वैयक्तिक बदनामी करू नका, कुठेही गडबड झाली तर गय करणार नसल्याचे सांगत निवडणुकीसंदर्भात परवानगी, आचारसंहिताबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य जालिंदर लांडे, भीमा कारखान्याचे संचालक बापूसाहेब जाधव, मेजर लिंगदेव निकम, प्रा. माउली जाधव यांनी पॅनेल प्रमुख म्हणून मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक खटके, तंटामुक्तीचे अध्यक्ष छत्रपती जाधव, माजी पोलीस अधीक्षक शशिकांत माने, आण्णासाहेब पाटील, प्रमोद जाधव, प्रशांत पाटील, राजेंद्र लांडे, सुभाष माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल नायकोडे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विनोद आंबरे, भारत जाधव, आनंद जाधव उपस्थित होते.
---
फोटो : ०९ कुरुल
कुरुल येथै शांतता कमिटीच्या बैठकीत आचारसंहितेसंदर्भात मार्गदर्शन करताना पोलीस उपविभागीय अधिकारी प्रभाकर शिंदे.